चिथावणीखोर माऱ्याला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/army-.jpg)
- बीएसएफने पाकिस्तानी रेंजर्सला सुनावले
नवी दिल्ली – शस्त्रसंधी उल्लंघनाच्या माध्यमातूून चिथावणीखोर मारा केल्यास जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल, अशा शब्दांत आज भारतीय सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) पाकिस्तानी रेंजर्सला सुनावले. पाकिस्तानी रेंजर्स हे त्या देशाच्या सीमेवर तैनात असणारे दल आहे.
बीएसएफ आणि पाकिस्तानी रेंजर्समध्ये जम्मू विभागात आज सायंकाळी ध्वज बैठक झाली. त्या बैठकीत सीमेवर शांतता प्रस्थापित करण्याविषयी आणि चिथावणीखोर मारा रोखण्याबाबत दोन्ही बाजूंमध्ये सहमती झाली. याआधी भारत आणि पाकिस्तानमध्ये 29 मे यादिवशी लष्करी मोहिमांविषयक महासंचालकांच्या (डीजीएमओ) स्तरावर बैठक झाली होती. त्या बैठकीत शस्त्रसंधी कराराचे पूर्ण पालन करण्याविषयी सहमती झाली होती. मात्र, त्या सहमतीनंतरही पाकिस्तानने आपले शेपूूट वाकडेच असल्याचे प्रत्यंतर दिले आहे.
मागील चार दिवस पाकिस्तानी सैनिक सातत्याने कुरापती काढून भारतीय हद्दीत मारा करत आहेत. त्या माऱ्याला भारतीय सुरक्षा दलांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. भारतीय प्रत्युत्तरात पाकिस्तानी रेंजर्सच्या अनेक चौक्या उद्धवस्त झाल्या. त्यामुळे उपरती होऊन पाकिस्तानी रेंजर्स बीएसएफशी चर्चा करण्यास पुढे आल्याचे मानले जात आहे.