चंदा कोचर यांच्यावर गुन्हा दाखल करणाऱ्या अधिकाऱ्याची दुसऱ्याच दिवशी बदली
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/chanda-kochhar.jpg)
आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोच आणि व्हिडिओकॉन समूहाचे अध्यक्ष व्ही एन धूत यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करणाऱ्या सीबीआय अधिकाऱ्याची दुसऱ्याची दिवशी बदली करण्यात आली आहे. पोलीस अधिक्षक सुधांशु धर मिश्रा हे दिल्लीतील सीबीआयच्या बँकिंग अँड सिक्युरिटी फ्रॉड सेलमध्ये कार्यरत होते. त्यांनी २२ जानेवारीला चंदा कोचर यांच्याविरोधात कारवाई केली होती. मिश्रा यांची रांची येथील सीबीआयच्या आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे.
चंदा कोचर आणि इतर लोकांविरोधात कारवाईच्या दोन दिवसांनंतर केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी सोशल मीडियावर सीबीआयच्या या कारवाईवर नाराजी व्यक्त केली होती. हा दु:साहसी तपास असल्याचे त्यांनी म्हटले होते. या मोहिमेचा कोणताच अंत नाही, असेही त्यांनी म्हटले होते. शुक्रवारी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी जेटलींची टिप्पणी रिट्विट केली होती. यादरम्यान सीबीआयच्या प्रवक्त्यांना याप्रकरणी फोन आणि मेसेजही पाठवण्यात आले, पण त्यांच्याकडून कोणतेच उत्तर आले नाही.
‘द संडे एक्स्प्रेस’ला सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेटलींची टिप्पणी ही ‘ज्येष्ठांनी दिलेला सल्ला’ होता. त्यांनी तपास यंत्रणांच्या कामात हस्तक्षेप केला, असे समजले जाऊ नये. जेटलींनी योग्य बाजू मांडली आहे. तुम्ही कोणत्याही पुराव्याशिवाय अशी कारवाई करू शकत नाही. कोणत्याही पुराव्याशिवाय बोर्डमध्ये सहभागी असलेल्या ज्येष्ठ सदस्यांविरोधात अशी कारवाई कशी करू शकता ? यामुळे निर्णयासंबंधीचे सर्व कामे ठप्प पडतील, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले.
काँग्रेसने अरुण जेटलींच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर निशाणा साधला. जेटली हे दुहेरी नितीअंतर्गत काम करत असल्याचा आरोप केला. जेटली हे तपास संस्थेवर दबाव आणत असल्याचे त्यांनी म्हटले. ते आपल्या वक्तव्याने तपास संस्थेला धमकी देत असल्याचे काँग्रेसचे खासदार माजी मंत्री आनंद शर्मा यांनी सांगितले.