गौरी लंकेश हत्या : ‘संशयिताकडे हत्येच्या दिवशी सोपवण्यात आले होते पिस्तूल’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/gauri-lankesh.jpg)
नवी दिल्ली : गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील संशयिताने हत्येच्या दिवशी आपल्याकडे ७.६५ मिमी पिस्तूल सोपवण्यात आली होती अशी माहिती चौकशीदरम्यान उघड केली आहे. गौरी लंकेश यांच्या घराबाहेर ही पिस्तूल सोपवण्यात आल्याचेही त्याने सांगितले आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येचा कट रचल्याचा संशय असणाऱ्या व्यक्तीने ही पिस्तूल सोपवलं होतं असंही उघड झालं आहे.
पुरुषोत्तम अशोक वाघमारे उर्फ परशू उर्फ कोहली उर्फ बिल्डर याला गौरी लंकेश यांच्यावर गोळी झाडून हत्या केल्याचा आरोपाखाली ११ जूनला अटक करण्यात आली. त्याने कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकाला (एसआयटी) दिलेल्या माहितीनुसार, हत्या झाली त्यादिवशी आणि त्याच्या आदल्या दिवशीच त्याने ते पिस्तूल सोबत ठेवलं होतं. मात्र गौरी लंकेश वेळेच्या आधी घरी पोहोचल्याने त्यांच्या हत्येचा प्लान एकदा रद्द करावा लागला होता. पण दुसऱ्या दिवशी त्यांनी हत्या केली.
एसआयटीने वाघमारेची पोलीस कस्टडी मिळवण्यासाठी दिलेल्या रिमांड अॅप्लिकेशनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, कट रचण्यात सहभागी असणाऱ्या एका व्यक्तीने वाघमारेला गौरी लंकेश यांची हत्या करण्याची सुपारी दिली. तसंच हत्या झाली तो दिवस आणि त्याच्या आदल्या दिवशी त्याच्याकडे पिस्तूल आणि बुलेट्स सोपवण्यात आल्या होत्या. हत्येनंतर काही वेळातच पिस्तूल आणि बुलेट्स कट रचणाऱ्यांना परत केल्याचं वाघमारेने सांगितली असल्याची माहिती पोलीस सुत्रांकडून मिळाली आहे.