गुहेत अडकलेल्या लहान मुलांच्या प्रशिक्षकाने मागितली पालकांची माफी
गेल्या दोन आठवड्यापासून थायलंडमधील सर्वात मोठ्या गुहेत अडकलेल्या लहान मुलांच्या फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकाने पालकांची माफी मागितली आहे. ‘सर्व मुले सुखरुप आहेत, मी त्यांची काळजी घेईनच. पण सर्व पालकांची मी माफी मागतो’, असे पत्र प्रशिक्षकाने लिहीले आहे.
थायलंडमधील चियांग राय प्रांतातील थांम लुआंग नांग नोन गुहेत बेपत्ता झालेल्या फुटबॉल संघाचा अखेर जवळपास नऊ दिवसांनी शोध लागला. थाय फुटबॉल संघातील ११ ते १६ वयोगटातील एकूण १२ मुले आणि त्यांचे प्रशिक्षक या गुहेत अडकले आहेत. या मुलांच्या सुटकेसाठी जगभरातून प्रार्थना होत असून स्थानिक आपातकालीन यंत्रणा आणि नौदलाचे प्रयत्न सुरु आहेत. या मुलांच्या मदतीसाठी गेलेल्या सिल कमांडोचा शुक्रवारी मृत्यू झाला होता.
शनिवारी खराब हवामानामुळे बचाव मोहीम थांबवण्यात आली आहे. गुहेत अडकलेल्या प्रशिक्षकाने पालकांसाठी एक पत्र लिहीले आहे. या पत्रात प्रशिक्षकांनी पालकांची माफी मागितली आहे. ‘सर्व पालकांना सांगतो की अजून तरी त्यांची मुलं सुखरुप आहेत. मी त्यांची नीट काळजी घेईनच असे आश्वासन मी त्यांना देतो. तुम्ही दिलेल्या मानसिक पाठिंब्यासाठी मी सर्वांचाच आभारी आहे. पण या घटनेसाठी मी पालकांची माफी मागतो, असे भावनिक पत्र त्यांनी लिहीले आहे.
दुसरीकडे विद्यार्थ्यांसोबत गुहेत अडकलेल्या प्रशिक्षकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या संघाचा शोध घेईपर्यंत नऊ दिवस प्रशिक्षकाने मुलांची देखभाल केली. त्यांना स्वत:कडे असलेले खाद्यपदार्थही दिले. ही मुलं सुरक्षित राहतील, यावरही प्रशिक्षकाने भर दिला.
दरम्यान, या मुलांच्या सुटकेसाठी थाय नौदल आणि थाय हवाई दल युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. चारहून अधिक देश आणि या देशांतील १ हजारांहून अधिक कमांडो, तज्ज्ञ या बचाव मोहीमेत सहभागी झाले आहेत. गुहेत अडकलेल्या एकाही मुलाला पोहता येत नसल्यानं पाणबुड्यांना त्यांना आधी प्रशिक्षण द्यावं लागणार आहे. पावसामुळे गुहेतील पाण्याची पातळी वाढत गेली तर मात्र मुलांना पोहण्यात अडथळे येऊ शकतात. ही गुहा वरून खोदून त्यानंतर या मुलांना बाहेर काढलं जाऊ शकते. मात्र, या दोन्ही पर्यायांचा विचार केला तरी या मुलांना आणखी काही महिने गुहेतच राहावे लागणार आहे.