गुजरातमधील फार्मा कंपनीची 4 हजार 700 कोटींची मालमत्ता जप्त
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/sterling-gujrat.jpg)
नवी दिल्ली – स्टर्लिंग बायोटेक ग्रुप या गुजरातस्थित फार्मा कंपनीची तब्बल 4 हजार 700 कोटी रूपयांची मालमत्ता आज जप्त करण्यात आली. सुमारे 5 हजार कोटी रूपयांचा बॅंक घोटाळा आणि मनी लॉण्डरिंग प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ही कारवाई केली.
स्टर्लिंगशी संबंधित 4 हजार एकर जमीन, प्लॅंट, यंत्रसामग्री, 200 बॅंक खाती, समभाग आणि लक्झरी कार आदी मालमत्तेवर टाच आणली गेली. मुंबईतील एक इमारत आणि जालना जिल्ह्यातील फार्महाऊसही जप्त करण्यात आले. स्टर्लिंगचे प्रवर्तक नितीन आणि चेतन संदेसरा फरार आहेत. स्टर्लिंगला विविध बॅंकांनी सुमारे पाच हजार कोटी रूपयांचे कर्ज दिले. मात्र, ते बुडित ठरले आहे.
पीएनबी घोटाळ्याचे सूत्रधार असणाऱ्या नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी या हिरे व्यापाऱ्यांची आणि त्यांच्या साथीदारांची ईडीने 7 हजार 600 कोटी रूपयांची मालमत्ता जप्त केली. त्यानंतर चालू वर्षात स्टर्लिंग प्रकरणी दुसऱ्या क्रमाकांची जप्तीची मोठी कारवाई झाली आहे.