कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सीईओ अमन मित्तल यांना कोरोनाची लागण
कोल्हापूर – कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांचा तपासणी अहवाल आज मंगळवारी कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. मित्तल यांची काल रॅपिड टेस्ट करण्यात आली होती. अहवालानंतर जिल्हा परिषदेतील मित्तल यांचे कार्यालय, अध्यक्षांचे कार्यालय, अँटी चेंबरचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.
मित्तल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हा परिषदेत अनेक बैठकांना उपस्थिती लावल्याने संपर्कातील लोकांनी काळजी घ्यावी, गरज वाटल्यास तपासणी करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात येणार असून या अहवालानंतर ज्या व्यक्तींमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत त्यांना पाच दिवस होम क्वारंटाईन करण्यात येणार आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा उद्या बुधवारी पार पडणार आहे. ही सभा ऑनलाईन होणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.





