कोणती विद्यापीठे ऑनलाइन डिग्री अभ्यासक्रम चालवू शकतील याबाबात यूजीसीचे निकष लवकरच जारी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/rbnqfmt9trxg03ao_1591935370.jpeg)
सध्या विद्यापीठांमध्ये ऑनलाइन डिग्री अभ्यासक्रम सुरु करण्याबाबत विचार सुरु आहे.पण सर्वच विद्यापीठांना ऑनलाइन डिग्री अभ्यासक्रम सुरु करता येणार नाहीये. त्यासाठी आता कोणती विद्यापीठे ऑनलाइन डिग्री अभ्यासक्रम चालवू शकतील याबाबात यूजीसीचे निकष लवकरच जारी होणार आहेत….
विद्यापीठांना ऑनलाइन पदवी अभ्यासक्रमांची परवानगी देण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने एक नियमावली तयार केली आहे. लवकरच या नियमावलीची घोषणा केली जाणार आहे. ज्या विद्यापीठांना नॅशनल असेसमेंट अँड अॅक्रिडिटेशन काऊन्सिल (नॅक) मूल्यांकनात ३.२६ किंवा त्यापेक्षा जास्त रेटिंग मिळाली आहे, अशा विद्यापीठांना पूर्णवेळ ऑनलाइन पदवी अभ्यासक्रम चालवण्याची परवानगी देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त ३.०१ किंवा त्यापेक्षा अधिक रेटिंग असणाऱ्या विद्यापीठांना आवश्यक परवानगी घ्यावी लागेल, त्यानंतरच ती विद्यापीठे ऑनलाइन डिग्री कोर्स सुरू करू शकणार आहेत.
यूजीसीने या नियमावलीला अंतिम स्वरुप दिले आहे आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय किंवा विधी मंत्रालयाकडे ही नियमावली परिक्षणासाठी पाठवली जाणार आहे. नियमावली जाहीर झाल्यानंतर विद्यापीठांना ऑनलाइन पदवी अभ्यासक्रम चालवणं सोपं होईल. विद्यापीठे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक सत्रापासून ऑनलाइन डिग्री कोर्स सुरू करू शकतील.
ज्या विद्यापीठांचे नॅक मूल्यांकन रेटिंग ३.२६ किंवा त्यापेक्षा अधिक आहे, त्यांना कोर्स सुरू करण्याविषयी केवळ कळवायचे आहे. मात्र ज्या विद्यापीठांचे रेटिंग ३.०१ किंवा त्यापेक्षा अधिक असेल त्यांना ऑनलाइन कोर्स सुरू करण्याआधी विद्यापीठाची परवानगी घ्यावी लागेल. नियमावली जारी झाल्यानंतर सुरुवातीच्या काही कालावधीकरिता ऑनलाइन पदवीची संख्या ठराविक मर्यादेपर्यंत असेल, जेणेकरून गुणवत्ता कायम राखली जाईल.
कोविड – १९ महामारीमुळे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय ऑनलाइन शिक्षणावर भर देत आहे. ऑनलाइन शिक्षणाला केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पातही प्राधान्य मिळाले आहे. केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली होती ती नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) रँकिंगमध्ये समाविष्ट असलेल्या टॉप १०० संस्थांना पूर्णवेळ ऑनलाइन डिग्री अभ्यासक्रम सुरू करण्याची परवानगी मिळेल.