कुंभमेळा २०१९: स्मृती इराणींनी केले कुंभमेळ्यात स्नान
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/123-1.jpg)
प्रयागराज येथे कुंभमेळ्याला सुरुवात झाली असून आज मकर संक्रांतीच्या निमित्ताने पहिले शाही स्नान संपन्न होत आहे. यात स्नान करण्यासाठी देशभरातून लोक आले असून या संगमात पहिले शाही स्नान करण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडाली होती. यामध्ये केंद्रिय मंत्री स्मृती इराणी यांनीही स्नान केले. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन इराणी यांनी याबाबतची माहिती दिली. हर हर गंगे असे लिहीत त्यांनी आपला शाही स्नानातील एक फोटो ट्विट केला आहे. हा फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून हजारो लोकांनी त्यांचा हा फोटो लाईक केला आहे. तर अनेकांनी त्यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
कुंभमेळ्यात यंदा ६ शाही स्नान होणार आहेत. आजच्या पहिल्या स्नानानंतर २१ जानेवारी रोजी पौष पोर्णिमेला दुसरे, ४ फेब्रुवारीला अमावस्येच्या दिवशी तिसरे, वसंत पंचमीला म्हणजेच १० फेब्रुवारीला चौथे स्नान होणार आहे. तर १९ फेब्रुवारीला माघ पौर्णिमेच्या सहावे आणि शेवटचे स्नान महाशिवरात्रीला म्हणजेच ४ मार्चला शेवटचे शाही स्नान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कुंभमेळ्यासाठी शुभेच्छा दिल्या. आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडियो ट्विट करत त्यांनी या शुभेच्छा दिल्या. मला आशा आहे की या निमित्ताने देश-विदेशातील भक्तांना भारताच्या अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक विविधतांचे दर्शन घडेल. माझी इच्छा आहे की जास्तीत जास्त लोक या भव्य-दिव्य सोहळ्यात सहभागी होतील.