कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसाला पळवून नेण्याचा रिक्षाचालकाचा प्रयत्न
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/Maharashtra-Police2.jpg)
औरंगाबाद | महाईन्यूज
कायद्याचा धाक नसलेल्या मुजोर रिक्षाचालकाने दादागिरी करीत कारवाई करण्यासाठी रिक्षात बसलेल्या वाहतूक पोलीस कॉन्स्टेबललाच पळवून नेण्याचा प्रयत्न केला. सिग्नलवर रिक्षाचा वेग कमी होताच प्रसंगावधान राखत वाहतूक पोलिसाने रिक्षातून उडी घेऊन स्वत:ची सुटका करून घेतल्याची घटना गुरुवारी सायंकाळी मध्यवर्ती बसस्थानक ते मिलकॉर्नरदरम्यान घडली. एवढेच नव्हे, तर दुसºया दिवशी सायंकाळी पुन्हा त्या रिक्षाचालकाने पोलिसांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली आणि अंगावर रिक्षा घालण्याची धमकी देत तो पोलिसांसमोरून निघून गेला आहे.
रिक्षाचालक फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी पादचाºयावर दोन वेळा रिक्षा घालून त्याचा मोबाइल लुटल्याची खळबळजनक घटना घडली. पोलिसांनी त्या रिक्षाचालकाला अटक केली. त्यानंतर रिक्षाचालकाने पोलिसांवरच दादागिरी केल्याचे समोर आले. वाहतूक शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल आयनाथ सुक्रे गुरुवारी सायंकाळी मध्यवर्ती बसस्थानक येथे वाहतूक नियमन करीत असताना रस्त्याच्या मध्यभागी थांबलेल्या रिक्षाचे त्यांनी मोबाइलमध्ये छायाचित्र घेतले आणि रस्त्यावरील रिक्षा बाजूला घेण्याचे त्यांनी चालकाला सांगितले असता तुला काय करायचे ते कर, असे उद्धटपणे सांगत रिक्षाचालकाने त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. सुक्रे हे त्याच्या रिक्षात बसले आणि रिक्षा बाजूला घेण्याचे सांगत असताना चालक वेगात मिलकॉर्नरकडे रिक्षा नेऊ लागला. सुक्रे यांनी त्याला रिक्षा थांबविण्यास अनेकदा सांगितले. मात्र, त्यांना रिक्षातून तो पळवून नेऊ लागला. मिलकॉर्नरजवळ सिग्नलवर रिक्षाचा वेग कमी होताच सुक्रे यांनी रिक्षातून उडी घेतली आहे.