काँग्रेस आणि भाजपाला अहंकार नडला-ओवेसी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/Asaduddin-Owaisi-2.jpg)
काँग्रेस आणि भाजपाला अहंकार नडला असे म्हणत एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी दोन्ही पक्षांवर निशाणा साधला आहे. तसेच तेलंगणच्या जनतेचे त्यांनी आभारही मानले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी या तिन्ही नेत्यांना त्यांचा अहंकार नडला. या सगळ्यांनी विरोधकांवर टीका करताना चुकीची भाषा वापरली. या अहंकारी नेत्यांचे गर्वहरण झाले आहे. तेलंगणातील जनतेने या सगळ्यांना नाकारले आहे असेही ओवेसी यांनी म्हटले आहे.
चंद्राबाबू नायडू यांनी आमचा उल्लेख सेटलर असा केला होता. मात्र आम्ही सेटलर नाही आम्हाला जनतेने कौल दिला आहे असेही ओवेसी यांनी म्हटले आहे. तसेच लोकसभेलाही सर्वशक्तीनिशी आम्ही मैदानात उतरू असेही ओवेसी यांनी म्हटले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी तेलंगणात ज्या ज्या ठिकाणी प्रचारासाठी हिंडले त्या त्या ठिकाणी त्यांच्या दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला. मोदी आणि शाह यांनाही त्यांचा अहंकार नडला. नुसत्या विकासाच्या गप्पा मारून काहीही होत नसते तसेच एकमेकांवर चिखलफेक करूनही काही होत नसते. लोक कोणी काम केले आहे त्याला महत्त्व देतात असेही ओवेसी यांनी म्हटले आहे.
पाच राज्यांचे निवडणूक निकाल आज सकाळपासूनच समोर येत आहेत. यामध्ये पाच पैकी तीन राज्यांमध्ये काँग्रेसने आघाडी घेतली आहे. तर मध्यप्रदेशात भाजपा आणि काँग्रेस यांच्यात काँटे की टक्कर आहे. अशात आता तेलंगणात मात्र काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांना जनतेने नाकाकले आहे. त्याचमुळे असदुद्दीन ओवेसी यांनी या दोन्ही पक्षांवर टीका केली आहे.