कर्नाटकात टाईट रेस ; कॉंग्रेस मोठा पक्ष की भाजप?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/karnataka-assembly.jpg)
- मतदानोत्तर चाचण्यांचे वेगवेगळे निष्कर्ष , त्रिशंकू स्थिती निर्माण होण्याची शक्यता
देवेगौडांचा जेडीएस बनणार किंगमेकर?
नवी दिल्ली -कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान पार पडल्यानंतर विविध मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले. चाचण्यांचे वेगवेगळे निष्कर्ष पाहता कर्नाटकची सत्ता मिळवण्यासाठी कॉंग्रेस आणि भाजपमध्ये टाईट रेस होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. बहुतांश चाचण्यांनी कुणालाच स्पष्ट बहुमत न मिळाल्याने त्रिशंकू स्थितीचे भाकीत केले आहे. अशी स्थिती निर्माण झाल्यास माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांचा जेडीएस हा पक्ष सत्ताधारी ठरवण्याबाबत किंगमेकर बनण्याची शक्यता आहे.
कॉंग्रेस पक्ष मोठा ठरणार की भाजप याबाबत मतदानोत्तर चाचण्यांनी परस्परविरोधी निष्कर्ष काढले आहेत. रिपब्लिक टीव्ही-जन की बात आणि एबीपी-सी व्होटर यांनी भाजपला सर्वांत मोठा पक्ष ठरवले आहे. त्यांच्या अंदाजानुसार भाजपला अनुक्रमे 95 ते 114 आणि 97 ते 109 इतक्या जागा मिळतील. त्या चाचण्यांनी कॉंग्रेसला अनुक्रमे 73 ते 82 आणि 87 ते 99 इतक्या जागा दिल्या आहेत. जेडीएसला अनुक्रमे 32 ते 43 आणि 21 ते 30 इतक्या जागा दाखवण्यात आल्या आहेत.
टाईम्स नाऊ-व्हीएमआर आणि इंडिया टुडे-ऍक्सिस माय इंडियाने कर्नाटकात सध्या सत्तेवर असणारा कॉंग्रेसच मोठा पक्ष ठरेल, असे भाकीत वर्तवले आहे. त्या चाचण्यांनी कॉंग्रेसच्या पदरात अनुक्रमे 90 ते 103 आणि 106 ते 118 इतक्या जागा टाकल्या आहेत. भाजपला अनुक्रमे 80 ते 93 आणि 79 ते 82 जागा मिळण्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. त्या चाचण्यांच्या मते जेडीएसला अनुक्रमे 31 ते 39 आणिण 22 ते 30 जागा मिळतील. न्युज एक्सच्या अंदाजानुसार भाजप, कॉंग्रेस आणि जेडीएसला अनुक्रमे 102 ते 110, 72 ते 78 आणि 35 ते 39 इतक्या जागांवर विजय मिळेल. या चाचण्यांचे निष्कर्ष पाहता इंडिया टुडेच्या मते कॉंग्रेसला तर रिपब्लिक टीव्हीच्या मते भाजपला बहुमत मिळेल.
कर्नाटकात विधानसभेच्या एकूण 224 जागा आहेत. त्यामुळे त्या राज्यात सरकार स्थापन करण्यासाठीचा जादुई आकडा 113 हा आहे. मागील निवडणुकीत कॉंग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवताना 122 जागा जिंकल्या. तर माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांच्या बंडामुळे फुटीला सामोऱ्या जाव्या लागलेल्या भाजपला 400 जागांवर समाधान मानावे लागले. जेडीएसलाही त्यावेळी 40 जागा मिळाल्या. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष असणारे येडियुरप्पा पुन्हा मुख्यमंत्री बनणार की कॉंग्रेसचे नेते सिद्धरामय्या मुख्यमंत्रिपद स्वत:कडे कायम ठेवणार याचा फैसला 15 मे यादिवशी होणाऱ्या मतमोजणीने होईल.