कर्नाटकच्या व्यावसायिकाकडून तब्बल 100 कोटींचे दान
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/100-crores-.jpg)
बंगळूर – कर्नाटकमधील एका दानशूर व्यावसायिकाने रोटरी फाऊंडेशनला तब्बल 100 कोटी रूपयांचे दान दिले आहे. डी.रविशंकर असे त्या दानशूराचे नाव आहे.
रिअल्टी व्यवसायात सक्रिय असणाऱ्या रविशंकर यांनी आर्थिक मागासांच्या भल्यासाठी हे परोपकारी पाऊल उचलले आहे. त्यांनी दिलेल्या निम्म्या देणगीचा उपयोग रोटरी इंटरनॅशनलच्या माध्यमातून जगभरात चालवल्या जाणाऱ्या कार्यासाठी केला जाणार आहे. उर्वरित निधी बालआरोग्य, मूलभूूत शिक्षण, पाणी, स्वच्छता, साक्षरता, आर्थिक विकास आदींशी संबंधित सहा कार्यांसाठी वापरला जाईल. एका भागीदारासमावेत हरा हाऊसिंग कंपनी स्थापन करणाऱ्या रविशंकर यांनी व्यवसायात मोठे यश मिळवले. मात्र, आता कमाईतील मोठा वाटा दान करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
गरिबांच्या यातनांची जाण असणाऱ्या रविशंकर यांना जनहिताचा वारसाच लाभला आहे. त्यांचे वडील कामेश हे स्वातंत्र्यसैनिक होते. विनोबा भावेंच्या भूदान चळवळीत सहभागी झालेल्या कामेश यांनी त्यांच्या मालकीची सर्व जमीन दान केली होती. एवढेच नव्हे तर, स्वातंत्र्यलढ्यावेळी त्यांनी तुरूंगवासही भोगला. दुर्दैवाने, वयाच्या चौथ्या वर्षी रविशंकर यांचे पितृछत्र हरपले. त्यानंतर आईनेच त्यांचे संगोपन केले. स्वकर्तृत्वावर व्यावसायिक भरारी घेणाऱ्या रविशंकर यांनी वडिलांचा वारसा पुढे नेत समाजाचे देणे चुकते केले आहे.