कर्नाटकची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कॉंग्रेस-बसपाची आघाडी?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/congress-bsp-together-for-rajya-sabhapng.jpg)
नवी दिल्ली – कर्नाटकच्या सत्तेतून बेदखल झाल्यानंतर कॉंग्रेसवर स्थानिक पक्षांशी आघाडी करण्याचा दबाव वाढू लागला असल्याची माहिती आहे. धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी आघाडी करणे गरजेचे आहे, असे क्षेत्रीय पक्षांचे मत आहे.
कॉंग्रेसमधील सूत्राने नाव न छापण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, आगामी काळात भाजपशासित राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये विधानसभेची निवडणूक होणे आहे. या राज्यांमध्ये कर्नाटकची पुनरावृत्ती होवू नये यासाठी कॉंग्रेसने क्षेत्रीय पक्षांशी निवडणुकपूर्व आघाडी करणे गरजेचे आहे, असा सल्ला काही पक्षांनी कॉंग्रेसला दिला आहे.
तिन्ही राज्यांमध्ये भाजप आणि कॉंग्रेसमध्ये मुख्य लढत होणे आहे. तरीसुध्दा, बसपा, सपा, डावे, इनेलो यासारख्या छोट्या पक्षांनी आपली व्होटबॅंक तयार केली आहे. कॉंग्रेसने या पक्षांना सोबत घेतले तर भाजपला तगडी टक्कर देता येईल. तज्ज्ञांच्या मते, कर्नाटकच्या निवडणुकीत बसपा आणि जेडीएसच्या आघाडीमुळे कॉंग्रेसच्या उमेदवारांना अनेक ठिकाणी मोठा फटका बसला आहे. कॉंग्रेसने बसपा-जेडीएसशी आघाडी केली असती तर निकाल वेगळा लागला असता, असेही त्यांचे मत आहे.
राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये बसपाची व्होटबॅंक आहे. राजस्थानमध्ये तर तीन आमदार आहेत. मागच्या निवडणुकीत मध्यप्रदेशात चार आणि छत्तीसगडमध्ये एक आमदार निवडून आले होते. यामुळे बसपाशी आघाडी करण्याचा दबाव कॉंग्रेसवर वाढू लागला आहे.