‘ओडिशात धर्मेंद्र प्रधान भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/dharmendra-pradhan-759.jpg)
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान हे ओडिशात भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील असे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री ज्युएल ओराम यांनी जाहीर केले आहे. दिल्लीत पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत ओडिशा केडरच्या आयएएस अधिकारी अपराजिता सारंगी या भाजपात सहभागी झाल्यानंतर ओराम यांनी ही माहिती दिली.
ओराम म्हणाले की, धर्मेंद्र प्रधान ओडिशामध्ये भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असतील. त्यांच्या नेतृत्वात आम्ही आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका लढवू. नवीन पटनाईक यांना सत्तेतून बेदखल करणे आणि राज्यात बिगर ओडिया नोकरशाहंचे सरकार संपुष्टात आणण्याचे आमचे लक्ष्य आहे.
सारंगी यांच्या भाजपात सामील होण्याबाबत ते म्हणाले की, प्राथमिक सदस्य म्हणून त्या सहभागी झाल्या आहेत. पक्षाचे दोन ज्येष्ठ नेते राउरकेलाचे आमदार दिलीप रे आणि राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य विजय महापात्रा यांनी भाजपाचा राजीनामा दिला आहे. यावर ओराम यांनी यामुळे पक्षाचे मोठे नुकसान होईल, अशी चिंता व्यक्त केली.