एनडीएतल्याच काही जणांना मोदी पुन्हा पंतप्रधान नको आहेत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/upendra-kushwaha-.jpg)
- केंद्रीय मंत्री कुशवाह यांचे प्रतिपादन
पाटणा – भाजप प्रणित एनडीए आघाडीतल्या काही जणांना नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधानपदी नको आहेत असा दावा विद्यमान केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह यांनी केला आहे. एका केंद्रीय मंत्र्यानेच हे विधान केल्याने त्या विषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे. उपेंद्र कुशवाह हे राष्ट्रीय लोकतांत्रिक समता पार्टीचे प्रमुख आहेत. पण हे लोक नेमके कोण आहेत त्यांची नावे सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिला.
ते म्हणाले की काही जण हेतुपुरस्सर अशा स्वरूपाची वक्तव्ये करीत आहेत. एनडीएत पंतप्रधानपदावरून संघर्ष निर्माण व्हावा असा हेतूही त्यांचा असावा असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. आपल्या पक्षाला मात्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान व्हावेत असे वाटते असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
कुशवाह यांनी अलिकडेच बिहार मध्ये राष्ट्रीय जनता दलाशी आघाडी करण्याचे संकेत देणारे वक्तव्य केले होते. तसेच या पक्षाने बिहार मधील लोकसभेच्या जागा वाटपासाठी एनडीएची बैठक बोलवावी अशी मागणी केली होती. त्यावरून कुशवाह यांचा पक्ष एनडीएतून बाहेर पडण्याच्या तयारीत असावा असा कयास बांधला जात आहे.