एकतर्फी प्रेमातून महिलेच्या ९ वर्षांच्या मुलीचे अपहरण, ट्रेनमधून आरोपीला अटक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/arrest11111_2017071646.jpg)
दिल्लीत एकतर्फी प्रेमातून विवाहितेच्या ९ वर्षांच्या मुलीचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी २८ वर्षांच्या तरुणाला एक्स्प्रेसमधून अटक केली आहे. विवाहितेने तरुणासोबत लग्न करण्यासाठी होकार द्यावा, यासाठी त्याने हे कृत्य केल्याचे पोलीस तपासातून निष्पन्न झाले आहे.
दिल्लीतील बौद्ध विहार परिसरात विवाहित महिला तिच्या चार मुलांसोबत राहते. तीन वर्षांपूर्वी त्या महिलेचा पती घर सोडून निघून गेला. काही महिन्यांपूर्वी महिलेला घरात किरकोळ दुरुस्तीचे काम करायचे होते. यादरम्यान तिची कमलेश या तरुणाशी ओळख झाली. कमलेशचे त्या महिलेवर एकतर्फी प्रेम होते. तो महिलेवर लग्नासाठी दबाव टाकत होता. मात्र, महिलेने त्याला नकार दिला होता. रविवारी महिलेची नऊ वर्षांची मुलगी घराजवळील दुकानात गेली होती. मात्र, बराच वेळ झाला ती घरी परतली नाही. महिलेने परिसरात शोधही घेतला, मात्र मुलगी सापडत नव्हती. अखेर तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून १२ पथकं तयार केली आणि मुलीच्या शोधमोहीमेला सुरुवात झाली. तब्बल ७५ पोलीस कर्मचारी तिचा शोध घेत होते. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता मुलगी एका दुचाकीस्वारासोबत जाताना दिसली. पोलिसांसाठी हा पुरावा पुरेसा होता. त्यांनी या आधारे आरोपीचा शोध घेतला. पोलिसांची आरोपीच्या हालचालींवर नजर होती. तो मुलीला घेऊन दिल्लीतून उत्तर प्रदेश येथील मूळगावी जाण्यासाठी निघाला. पोलिसांनी याची माहिती रेल्वे पोलिसांना दिली आणि उत्तर प्रदेशमधील रेल्वे पोलिसांनी महोबा रेल्वे स्थानकात मुलीची आरोपीच्या तावडीतून सुटका केली. फिरायला नेतो, असे सांगून कमलेशने त्या मुलीला सोबत नेले होते. आरोपीची अवघ्या १२ तासांमध्ये तुरुंगात रवानगी करण्यात पोलिसांना यश आले.