उत्तर भारतात पुन्हा वादळाचा फटका ; ४० जणांचा बळी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/delhi-storm-.jpg)
नवी दिल्ली : दिल्लीत रविवारी संध्याकाळी वेगवान वाऱ्यांसह अचानक आलेल्या धुळीच्या वादळाने दिल्लीसह परिसराला तडाखा दिला. यावेळी तब्बल १०९ किमीपर्यंत वेगाने वारे वाहिल्याची नोंद करण्यात आली. काही भागात पावसाच्या हलक्या सरीही कोसळल्या. खराब हवामानाचा विमान वाहतुकीसह, रेल्वे, मेट्रोलाही फटका बसला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या, भिंत कोसळण्याच्या घटना घडल्या.
दरम्यान, यूपीत २१, बंगालमध्ये १२ आणि दिल्लीत दोघांचा मृत्यू झाला. तर आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये विज कोसळून ९ जणांना प्राण गमवावे लागले. दिल्लीतील सफदरजंग भागात संध्याकाळी ४ वाजून ४४ मिनिटांच्या सुमाराला १०९ किमी वेगाने वारे वाहिल्याची नोंद झाली. हे वादळ ४ वाजून ४६ मिनिटांपर्यंत सुरू राहिले. तर दुसरा तडाखा पालम भागाला बसला. तिथे संध्याकाळी ४ वाजून ३३ मिनिटांच्या सुमारास ९६ किमी वेगाने वारे वाहिल्याची नोंद झाली, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली. यानंतर पावसाचा हलकासा शिडकावा झाला. त्यामुळे तापमानाचा पारा तब्बल १० सेल्सियसने उतरल्याने दिल्लीकरांना दिलासा मिळाला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे नजफगढ, ट्रान्झिट कॅम्प, नेहरू प्लेस, उत्तम नगर, पालम येथे झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या.