इमरान खान यांच्या तिसऱ्या पत्नीच्या पहिल्या पतीची माफी न मागितल्याने पोलीस अधिकारी निलंबित
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/imran-khan-.jpg)
लाहोर (पाकिस्तान) – पाकिस्तानात एका पोलीस अधिकाऱ्याचे निलंबन मोठ्या विचित्र कारणासाठी झाल्याचे उघड झाले आहे. निलंबन केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे रिझवान उमर गोंदल. ते पंजाबचे डीपीओ (डिस्ट्रिक्ट पोलीस ऑफिसर) आहेत. पंतप्रधान इम्रान खान यांच्या तिसऱ्या पत्नीचे पहिले पती खावर मनिका यांची माफी मागण्यास नकार दिल्याबद्दल त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
रिझवान उमर गोंदल यांनी 23 ऑगस्ट रोजी रात्री पाकपत्तन इलाख्यातील एका चेक पोस्टवर लाहोरहून परत येणाऱ्या खावर मनिका यांना थांबण्याचा इशारा केला. पोलीसांनी थांबण्यास सांगूनही खावर मनिका तसेच पुढे गेल्याने पोलीसांनी त्यांचा पाठलाग केला. खावर मनिका यांनी आपण कोण आहोत याची ओळख दिल्यानंतरही पोलीसांनी त्यांना सोडले नाही; तेव्हा संतापून खावर पोलीसांना बरेच भलेबुरे बोलले.
प्रकरण वरपर्यंत गेले. रिझवान उमर गोंदल यांना नवनिर्वाचित मुख्यमंत्री उस्मान वजदार यांनी बोलावून घेतले. खावर यांनी रिझवान उमर गोंदल यांच्यावर गैरवर्तणुकीचा आरोप केला. त्यामुळे रिझवान उमर गोंदल यांना खावर यांची माफी मागण्यास सांगण्यात आले. रिझवान उमर गोंदल यांनी माफी मागण्यास नकार देताच मुख्यमंत्र्यांनी त्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले.
रिझवान उमर गोंदल यांना पंतप्रधान इमरान खान यांच्या आदेशावरूनच काढण्यात आले आहे, असे नाव जाहीर न करण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्याने सांगितले. या वर्षाच्या सुरुवातीला इमरान खान यांनी आपली आध्यात्मिक गुरू बुशरा बरोबर निकाह केला असून खावर मानिका हे बुशराचे माजी पती आहेत.
इमरान खान यांच्या कृतीवर विरोधी पक्ष पीएमएल (एन) टीका केली असून इमरान खान यांचे हे कृत्य खेदजनक असल्याचे म्हटले आहे.