इंडोनेशियात एका माणसाच्या मृत्यूबदली जमावाने मारल्या 300 मगरी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/australia-crocodile-1-1.jpg)
सोरोंग (इंडिनेशिया): मगरींनी एका माणसाला मारल्याचा सूड म्हणून संतप्त जमावाने 300 मगरींची निर्घृण हत्या केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. शनिवारी पापुआ प्रांतात ही घटना घडली. आपल्या गुरांसाठी चारा आणण्यास गेलेला सुगिटो नावाचा एक गावकरी चुकून पाळलेल्या मगरींच्या भागात गेला. मगरींच्या गराड्यात सापडल्यानंतर एका मगरीने त्याचा पाय तोडला आणि दुसऱ्या एका मगरीच्या शेपटीच्या तडाख्याने त्याचा मृत्यू झाला. मरण पावलेल्या सुगिटोच्या कुटुंबीयांना मगरींचा मालक नुकसान भरपाई देण्यास तयार होता. पण संतप्त जमावाने काही न ऐकता बेभानपणे लाठ्याकाठ्या आणि तीक्ष्ण हत्यारांनी 292 मगरींना मारून टाकले. यात चार इंच लांबीच्या मगरीच्या पिलांपासून ते 2 मीटर लांबीच्या मगरींचा समावेश होता, पोलीस आणि सुरक्षा अधिकारी जमावाल रोखू शकले नाहीत. इंडोनेशियात मगरींच्या अनेक प्रजाती आढळतात. तेथे मगर हा संरक्षित जीव आहे.