आफ्रिकन देशांतून चीनची “गधे’चोरी !
नैरोबी – चीनमध्ये गाढवांचे स्मगलिंग होत असल्याने आफ्रिकन देशांमध्ये अलीकडच्या काळात गाढवांचा तुटवडा जाणवू लागला आहे. चीनमध्ये जिलेटिनची मागणी मोठ्या प्रमाणवर असून ती दिवसेदिवस वाढत आहे. गाढवाच्या कातडीपासून जिलेटिन बनवत असल्याने चीनमध्ये गाढवांची मागणीही वाढती आहे. जिलेटिनसाठी हत्या होत असल्याने चीनमध्ये गाढवांचा तुटवडा जाणवू लागला आहे.
गाढवांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आफ्रिकन देशांतून स्मगलिंग करून चीनमध्ये गाढवे आणली जात आहेत. आफ्रिकेतील गाढवांची चीनमध्ये चोरटी निर्यात होत असल्याने आफ्रिकेतील लोकांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शेतीकामासाठी आणि मालवाहतुकीसाठी आफ्रिकेत गाढवांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
चीनमधील जिलेटिनची मागणी पूर्ण करण्यासाठी गाढवांची हत्या करून त्यांच्या कातड्यांची चीनला निर्यात केली जाते, केनियापासून अगदी बुरकिनी फासोपर्यंत आणि इराणपासून नायजेरियापर्यंतच्या पशुतज्ज्ञांचा आरोप आहे. गाढवाच्या कातडीपासून जिलेटिनची निर्मिती होते. वैद्यकीय क्षेत्रातही त्याचा वापर केला जातो. चीनमध्ये गाढवांचा तुटवडा असल्यानेआफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेतूनही त्याची पूर्तता केली जात असल्याचे पशु अधिकार कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.