आता बंगाली मुली बारमध्येच नाचतात; मेघालयच्या राज्यपालांचं वादग्रस्त वक्तव्य
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/tathagata-roy.jpg)
मेघालयचे राज्यपाल तथागत रॉय यांच्या वक्तव्याने पश्चिम बंगालमध्ये खळबळ माजली आहे. पश्चिम बंगाल हे राज्य एकेकाळी महान होते. परंतु आता राज्याची महानता नाहीशी झाली आहे. आता बंगाली लोक लाद्या पुसण्याचे काम करतात, तर बंगाली मुली बारमध्ये नाचतात, असे वादग्रस्त वक्तव्य तथागत रॉय यांनी केले. काही राज्यांमध्ये हिंदी भाषा शिकवण्यावर सुरू असलेल्या विरोधावर ट्विटरवरून आपले मत व्यक्त करत होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. दरम्यान, यानंतर आपले वक्तव्य चुकीच्या पद्धतीने सर्वासमोर आणले असल्याचे स्पष्टीकरण रॉय यांनी दिले.
तथागत रॉय हे बऱ्याच काळापासून भाजपाशी जोडलेले आहेत. तसेच त्यांचे बंधू प्राध्यापक सौगत रॉय हे दमदमधून तृणमूल काँग्रेसचे खासदार आहेत. दरम्यान, तथागत रॉय यांनी बंगालमध्ये हिंदी भाषा शिकण्याला होत असलेला विरोध म्हणजे ज्ञानाची कमी आणि राजकीय मुद्दा असल्याचे सांगितले. तसेच आता बंगाली लोक लाद्या पुसण्याचे काम करतात, तर बंगाली मुली बारमध्ये नाचतात, असेही ते म्हणाले. तृणमूल काँग्रेसने त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला. दरम्यान, हिंदीच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी आसाम, महाराष्ट्र आणि ओदिशासारख्या राज्यांचाही उल्लेख केला. ही राज्ये गैर हिंदी भाषिक आहेत. परंतु त्या ठिकाणी हिंदीचा विरोध होत नाही. तर दुसरीकडे पश्चिम बंगाल विद्यासागर, स्वामी विवेकानंद, रवींद्रनाथ टागोर आणि नेताजी सुभाष चंद्र बोस यांची भूमी आहे. तर बंगाली लोकांना का हिंदी शिकले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले होते.
दिग्गजांचा काळ आता गेला आहे आणि पश्चिम बंगालची महानताही गेली आहे. हरियाणा पासून केरळपर्यंत बंगाली मुलं सर्वांच्या घरी लाद्या पुसण्याचे काम करत आहेत. तर बंगाली मुली बारमध्ये नाचत आहे. आता इथली मुले आपण ज्याची कल्पनाही करू शकत नाही, असे काम करत आहेत, असे रॉय यांनी ट्विटमध्ये म्हटले. यानंतर अनेक नेटकऱ्यांनी त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला. तर दुसरीकडे तृणमूल काँग्रेसने त्यांच्याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.