अयोध्या प्रकरणी तातडीने सुनावणी नाही
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/ayodhya-dispute-696x398.jpg)
सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली; जानेवारीत होणार सुनावणी
नवी दिल्ली: अयोध्या येथील रामजन्मभूमी-बाबरी मशिदीच्या वादग्रस्त जमीनीच्या प्रकरणावर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. याबाबतची याचिका फेटाळत याबाबत जानेवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात सुनावणी घेणार असल्याचे स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि न्या. एस. के. कौल यांच्या खंडपीठापुढे आज सुनावणी झाली. यावेळी सरन्यायाधीश रंजन गोगोई म्हणाले, या प्रकरणावर लवकर सुनावणी घेणे आम्हाला गरजेचे वाटत नाही. याबाबत यापूर्वीच आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे जानेवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात सुनावणी होईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
दरम्यान, वादग्रस्त जमीनीचे तीन भाग करुन रामलला, निर्मोही अखाडा आणि मुस्लिम संघटनांना देण्याच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या याचिकेवर ऑक्टोबरमध्ये सुनावणी घेण्यात आली होती. न्या. गोगोई यांनी या याचिकेवर पुढील वर्षी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी घेतली जाईल, असे जाहीर केले होते.
त्यानंतर हिंदूत्ववादी संघटना आणि भाजपच्या काही नेत्यांनी राम मंदिरासाठी अध्यादेश काढण्याची मागणी केली आहे. मंदिराचा प्रश्न सोडण्यासाठी खूप उशीर झाला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि शिवसेनेने त्याविरोधात प्रदर्शन करण्याचा इशारा दिला आहे.