अयोध्याप्रश्नी सुप्रीम कोर्टात आज ५ सदस्यीय घटनापीठापुढे सुनावणी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/supreme-court-.jpg)
संवेदनशील अयोध्या प्रकरणातील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद जमिनीच्या वादावर आज सुप्रीम कोर्टात ५ सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. या पीठाच्या अध्यक्षस्थानी सरन्यायाधीश रंजन गोगोई तर अन्य न्यायाधीशांमध्ये न्या. एस. ए. बोबडे, न्या. एन. वी. रमन्ना, न्या. यु. यु.लळीत आणि न्या. डी. वाय. चंद्रचूड यांचा समावेश आहे. यापूर्वी ६ जानेवारी रोजी याप्रकरणी कोर्टाने केवळ अर्ध्या मिनिटांत सुनावणी घेत खंडपीठ तयार करण्यात येईल असे सांगितले होते.
त्यामुळे या खटल्यासाठी निश्चित करण्यात आलेले ५ सदस्यीय घटनापीठ आता इलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणी करणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने गेल्या वर्षी २७ डिसेंबर रोजी २-१च्या बहुमताने हे प्रकरण ५ सदस्यीय घटनापीठाकडे पाठवण्यास नकार दिला होता. तसेच मशीद इस्लामचा अभिन्न भाग नसल्याचे म्हटले होते.