breaking-newsआंतरराष्टीय

अमेरिकेत विमानतळावरच इम्रान खान यांचा अपमान

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान मोठया अपेक्षेने अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. पण अमेरिकेने त्यांच्या दौऱ्याला फारसे महत्व दिले नसल्याचे दिसत आहे. इम्रान खान यांचे शनिवारी अमेरिकेत आगमन झाले. त्यावेळी विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी ट्रम्प प्रशासनातील कुठलाही मंत्री किंवा बडा अधिकारी उपस्थित नव्हता. अमेरिकेत दुसऱ्या देशाच्या प्रमुखाचे खास स्वागत करण्याची परंपरा आहे. पण विमानतळावर इम्रान यांचे जोरदार स्वागत करण्यात आले नाही.

इम्रान खान यांच्यासोबत परराष्ट्र सचिव सोहेल महमूद आणि वाणिज्य सचिव अब्दुल रझ्झाक होते. विमानतळावर इम्रान यांचे त्यांच्याच सरकारमधले परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी आणि मोठया संख्येने उपस्थित असलेल्या पाकिस्तानी अमेरिकन नागरीकांनी स्वागत केले. प्रोटोकॉल अधिकारी हाच अमेरिकेचा सर्वोच्च अधिकारी त्यावेळी विमानतळावर उपस्थित होता.

पाकिस्तान सध्या आर्थिक संकटात असल्यामुळे पैसे वाचवण्यासाठी इम्रान खान कतार एअरवेजच्या विमानाने अमेरिकेत पोहोचले. त्यानंतर त्यांनी मेट्रोमधून प्रवास केला. पंतप्रधान झाल्यानंतर इम्रान खान यांचा हा पहिलाच अमेरिका दौरा आहे. इम्रान खान सोमवारी व्हाइट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतील. ट्रम्प प्रशासनाने अनेकदा पाकिस्तानला फटकारले आहे. त्यामुळे पाकिस्तान-अमेरिका द्वीपक्षीय संबंध बळकट करणे तसेच अमेरिकेकडून आर्थिक मदत पदरात पाडून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. इम्रान अमेरिकेतील पाकिस्तानचे राजदूत असद माजीद खान यांच्या निवासस्थानी मुक्काम करणार आहेत. ऑक्टोंबर २०१५ मध्ये अमेरिका दौऱ्यावर जाणारे नवाझ शरीफ पाकिस्तानचे शेवटचे पंतप्रधान होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button