अमेरिकेच्या संरक्षणमंत्रिपदी मार्क एस्पर यांची निवड
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/vdh02-1.jpg)
वॉशिंग्टन : अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅपिटॉल हिलचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार राहिलेले व पहिल्या इराक युद्धाचा अनुभव असलेले माजी लष्करी अधिकारी मार्क एस्पर यांचे नाव संरक्षण मंत्रिपदासाठी निश्चित केले आहे.
ट्रम्प यांनी मंगळवारी सांगितले, की सध्याचे लष्कर सचिव मार्क एस्पर हे हंगामी पातळीवर संरक्षण मंत्री म्हणून काम पाहतील. मार्क यांच्याविषयी आपल्याला माहिती आहे, ते संरक्षण मंत्रिपदाची जबाबदारी चांगली पार पाडू शकतील असा विश्वास वाटतो, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. एस्पर यांची कायमस्वरूपी संरक्षण मंत्रिपदी नेमणूक करू असेही त्यांनी स्पष्ट केले. एस्पर हे अनुभवी असून अनेक दिवस त्यांच्या नावावर चर्चा सुरू होती.
सध्याचे हंगामी संरक्षण मंत्री पॅट्रिक श्ॉनहान यांनी संरक्षणमंत्रिपदाच्या शर्यतीतून माघार घेतली असून त्यांचे नाव सिनेटकडे पाठवले जाण्यापूर्वीच त्यांनी कौटुंबिक कारणास्तव पदावर राहणार नाही असे स्पष्ट केले.
नवे संरक्षण मंत्री एस्पर यांचा नोव्हेंबर २०१७ मध्ये लष्कर सचिव म्हणून शपथविधी झाला होता. त्याआधी ते रेथिऑन या कंपनीत सरकार- संरक्षण संबंध विषयक उपाध्यक्ष होते . एस्पर हे एक प्रकारे दबाव गटासाठी काम करीत होते व त्यांनी शेकडो डॉलर्सची कंत्राटे त्या वेळी कंपनीला मिळवून दिली होती. त्यांनी लष्कर सचिव म्हणून काम करताना कुठली कंत्राटे दिलेली नाहीत, पण त्यांच्या पुढील निर्णयांवर मागील पाश्र्वभूमीचा परिणाम होऊ शकतो. रेथिऑन व युनायटेड टेक्नॉलॉजीज या कंपन्यांच्या विलीनीकरण प्रक्रियेवर त्यांच्या पदाचा परिणाम शक्य आहे, अशी टीका क्रू एक्झिक्युटिव्हचे संचालक नोआ बुकबाइंडर यांनी केली आहे. एस्पर यांनी सिनेटचे नेते बिल फ्रिस्ट यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून काम केले होते.