Breaking-newsआंतरराष्ट्रीय
अमेरिकेच्या राजदूताच्या गाडीवर ढाक्यात हल्ला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/marcia-banicat-.jpg)
ढाका (बांगला देश): अमेरिकेच्या बांगला देशातील राजदूत मर्सिया बर्निकॅट यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. राजदूत मर्सिया बर्निकॅट आणि त्यांचे कर्मचारी असलेल्या गाडीवर शनिवारी रात्री सशस्त्र जमावाने हल्ला केला. शनिवारी ढाक्यातील महंमदपूर भागात ही घटना घडली. मात्र राजदूत मर्सिया बर्निकॅट, त्यांचे सुरक्षा कर्मचारी आणि ड्रायव्हर सुरक्षित असून् त्यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नाही, सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या दोन वाहनांचे नुकसान झाले आहे; असे अमेरिकन दूतावासाच्या प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
हजारो लोक ढाक्यातील रस्त्यांवर उतरले आहेत. त्यात विद्यार्थ्यांचे प्रमाण मोठे आहे. एका बसच्या धडकीने दोन विद्यार्थी मरण पावल्यानंतर गेला आठवडाभर ही दंगल चालू आहे. पोलीस आणि आंदोलक यांच्या चकमकीत अनेकजण जखमी झाले आहेत. यातही विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलीसांनी अश्रुधूर आणि रबरी गोळ्यांचा वापर केल्याची माहिती आंतरराष्ट्रीय मीडियाने दिली असली, तरी पोलीसांनी त्याचे खंडन केले आहे. अश्रुधूर वा रबरी गोळ्यांचा वापर केला नसल्याचा खुलासा पोलीसांनी केला आहे. मर्सिया बर्निकेट फेब्रुवारी 2015 पासून अमेरिकेच्या बांगला देशातील राजदूत आहेत.