Breaking-newsआंतरराष्ट्रीय
अमेरिकेचे विदेश मंत्री पुन्हा जाणार उत्तर कोरियात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/nort-koria-vs-america.jpg)
- तडजोडीची चर्चा नेणार पुढे
वॉशिंग्टन– अमेरिकेचे विदेश मंत्री माईक पॉम्पेओ हे येत्या रविवारी उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग उन यांच्याशी चर्चा करण्यासाठी तिकडे जात आहेत. उत्तर कोरियाच्या प्रमुखांशी अमेरिकेच्या अध्यक्षांनी चर्चा केल्यानंतर त्यांच्या बऱ्याचशा अटी किम जोंग यांनी मान्य केल्या होत्या. त्या चर्चेचा पुढील टप्पा गाठण्यासाठी आणि निशस्त्रीकरणाच्या करारावर चर्चा करण्यासाठी किम जोंग तिकडे जात आहेत.
उत्तर कोरियाच्या अण्विक कार्यक्रमामुळे साऱ्या जगावर युद्धाचे ढग जमा झाल्यानंतर उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग हे अमेरिकन अध्यक्षांशी चर्चा करण्यास तयार झाले होते. तथापि शांततेच्या चर्चेसाठी आम्ही अण्वस्त्रे निकामी केलेली नाहीत असे उत्तर कोरियाने मध्यंतरी म्हटले होते. त्यामुळे पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर पॉम्पेओ यांच्या उत्तर कोरिया भेटीला महत्व दिले जात आहे. किम जोंग आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चर्चेची आणखी एक फेरी व्हावी यासाठी पॉम्पेओ प्रयत्नशील आहेत. त्यांची ही चौथी उत्तर कोरियाची भेट आहे.
दरम्यान उत्तर कोरियावरील निर्बंध मागे घ्यावेत अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे. पण जो पर्यंत उत्तर कोरिया खात्रीशीरपणे आपल्याकडील अण्वस्त्रे नष्ट करीत नाही तोपर्यंत त्यांच्यावरील आंतरराष्ट्रीय निर्बंध उठवायचे नाहीत अशी अमेरिकेची स्पष्ट भूमिका आहे.