अफगाणिस्तानातील बॉम्बस्फोटात 30 ठार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/Flag_of_Afghanistan.png)
खोस्त (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानातील खोस्त प्रांतात मतदार नोंदणी केंद्रामध्ये झालेल्या शक्तीशाली बॉम्बस्फोटामध्ये किमान 30 जण ठार झाले आहेत. एका मशिदीच्या मैदानामध्ये या मतदार नोंदणी केंद्राचा तंबू उभा केला गेला होता. मशिदीतून बाहेर पडलेल्या नागरिकांनी मोठ्या संख्येने नोंदणीसाठी या तंबूमध्ये गर्दी केली असताना हा स्फोट झाला. त्यामुळे जिवीतहानी मोठ्या संख्येने झाली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र प्रांतिय सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपसंचालक गुल मोहम्मद मंगल यांनी या स्फोटामध्ये 12 जण ठार आणि 33 जण जखमी झाल्याचे सांगितले. मात्र जखमी झालेल्या अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
निवडणूकांची तयारी सुरू झाल्यानंतर आठवड्याभरातच काबुलमध्ये झालेल्या दुहेरी बॉम्बस्फोटामध्ये 25 जण ठार झाले होहोते. तर खोस्त प्रांतातील अन्य बॉम्बस्फोटामध्ये 9 पत्रकारही ठार झाले होते. अफगाणिस्तानमध्ये 20 ऑक्टोबरला होणाऱ्या संसदीय आणि जिल्हा परिषदांच्या निवडणूकीसाठी नागरिकांनी मतदार नोंदणी करू नये म्हणून नोंदणी कार्यालयांमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणले जात आहेत. काबुलमधील मतदार नोंदणी केंद्रात 22 एप्रिल रोजी झालेल्या अशाच बॉम्बस्फोटामध्ये 60 जण ठार तर 100 जण जखमी झाले होते.