अकबराने राजपूत महिलेकडे मागितली होती जीवाची भीक: भाजपा प्रदेशाध्यक्ष
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/Akbar.jpg)
भारतीय जनता पार्टीचे राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष मदनलाल सैनी यांनी मुघल सम्राट अकबराबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. अकबर मीना बाजारमध्ये जाऊन महिलांची छेड काढायचा आणि एका राजपूत महिलेकडे अकबराला जीवाची भीक मागावी लागल्याचे वक्तव्य सैनी यांनी केले आहे. या प्रकरणावरुन राजस्थानमध्ये सत्तेत असणाऱ्या काँग्रेसने सैनी यांच्यावर टिका केली केली.
गुरुवारी (६ जून) रोजी देशभरामध्ये मेवाडचे राजे महाराणा प्रताप यांची जयंती साजरी करण्यात आली. राजस्थानमधील जयपूर येथील भाजपाच्या प्रदेश मुख्यालयामध्येही मोठ्या उत्साहात महाराण प्रताप यांची जयंती साजरी करण्यात आली. भाजपाने काही विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले होते. भाजपाने आयोजित केलेल्या या सोहळ्यानंतर सैनी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अकबराबद्दल वादग्रस्त विधान केले.
सैनी यावेळी बोलताना म्हणाले, ‘अकबराने मीना बाजारची स्थापना केली. तेथे केवळ महिलांना काम देण्यात आले होते. पुरुषांना मीना बाजारात जाण्यास बंदी होती. अकबर तेथे जाऊन महिलांसोबत दुष्कर्म करायचा. या सर्व घटनांची इतिहासामध्ये नोंद आहे.’
पुढे बोलताना सैनी यांनी मीना बाजार का बंद करण्यात आला याबद्दलही वक्तव्य केले. एका राजपूत महिलेची छेड काढण्याचा प्रयत्न केला असता तिने अकबराला धडा शिकवल्याचा दावा सैनी यांनी केला आहे. ‘अकबराला किरण देवी यांची छेड काढायची होती. मात्र त्या सतर्क होत्या. त्यांनी अकबराला जमीनीवर पाडले आणि त्याच्या छातीवर छोटा सुरा ठेवला. त्यावेळी ‘हिंदुस्तानचा बादशाह तुझ्यासमोर नतमस्तक होतोय’ असं म्हणत अकबराने त्यांच्याकडे जिवाची भीक मागितली. या घटनेनंतर मीना बाजार बंद करण्यात आला,’ असं सैनी म्हणाले.
या प्रकरणावरुन वाद झाल्यानंतर ‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना सैनी यांनी महाराणा प्रताप आणि अकबराची तुलना होऊ शकत नाही असं मत नोंदवलं. ‘राजस्थानमधील सध्याच्या राज्य सरकारने महाराणा प्रताप आणि अकबर यांची तुलना केली. म्हणून मला इतकेच म्हणायचे आहे की या अकबर हा भारतावर हल्ला करणारा हल्लेखोर होता तर महाराणा प्रताप यांनी देशाच्या रक्षणासाठी २५ वर्ष लढा दिला. जर अकबर महान असता तर त्याने त्याच्या पूर्वजांनी नष्ट केलेली मंदिरे पुन्हा बांधली असती. मात्र तसे झाले नाही. म्हणूनच अकबर आणि महाराणा प्रताप यांची तुलना होऊ शकत नाही,’ असं मत सैनी यांनी व्यक्त केले.
सैनी यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसने त्यांच्यावर टिका केली आहे. ‘सैनी यांनी ज्याप्रकारे आपले मत मांडले आहे ते अत्यंत निंदनीय आहे’ असं मत काँग्रेसच्या प्रवक्त्या अर्चना शर्मा यांनी व्यक्त केले आहे.