दहशतवाद्यांनी घरात घुसून केली पोलिसाची हत्या

जम्मू– काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी घरात घुसून पोलिसाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. समीर अहमद मीर असे या पोलिसाचे नाव असून या घटनेनंतर सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहीम राबवली आहे.
पुलवामा जिल्ह्यातील हंजान पायीन या भागात समीर मीर कुटुंबीयांसोबत राहतात. मंगळवारी संध्याकाळी दहशतवादी त्यांच्या घरात घुसले आणि समीर यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात जखमी झालेल्या समीर यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या शोध घेण्यासाठी परिसरात मोहीम राबवली.
दरम्यान, गेल्या वर्षभरात जम्मू- काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी एकूण 257 दहशतवाद्यांचा खात्मा केला. तर दहशतवाद्यांच्या गोळीबारात एकूण 95 जवान शहीद झाले. यात जम्मू- काश्मीर पोलीस दलातील 45 अधिकाऱ्यांचा समावेश आहे.





