पुण्यात अपघातांचं सत्र सुरूच, मर्सिडीजच्या गाडीखाली चिरडून दुचाकी चालकाचा मृत्यू
पुणे | पुण्यात अपघाताचे सत्र सुरूच आहे. येरवड्यातील गोल्फ कोर्स चौकात मर्सिडीज बेंज गाडीखाली चिरडून एका दुचाकी चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. केदार मोहन चव्हाण वय ४१ असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. कारचालक नंदू अर्जुन ढवळे या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवड्यातील गोल्फ कोर्स चौकातून केदार चव्हाण हे दुचाकीवरून जात होते. त्यावेळी अचानक केदार चव्हाण यांची दुचाकी रस्त्यावर घसरली आणि ते रस्त्यावर पडले. त्याचवेळी मागून आलेली मर्सिडीज बेंज कार केदार चव्हाण यांच्या अंगावर गेली आणि त्या घटनेमध्ये ते गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. त्यानंतर केदार चव्हाण यांना तात्काळ जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कार चालक आरोपी नंदू अर्जुन ढवळे याला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे येरवडा पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा – ‘पिंपरी विधानसभा RPI ला दिली पाहिजे अन्यथा..’; RPI चा महायुतीला इशारा
दरम्यान, १९ मे ते १४ जून या कालावधीमध्ये पुण्यामध्ये तब्बल ७० अपघात घडले आहेत. या अपघातांना सर्वाधिक कारणीभूत पुण्यातील वाहनांचा भरधाव वेग कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे भरधाव वाहनांचा वेग पुणेकरांच्या जीवावर उठल्याचे दिसून येत आहे. दारू पिऊन वाहने चालवण्याची संख्या सुद्धा मोठी आहे. अपघात झालेल्या सर्वच प्रकरणांचा उलगडा झाला नसला, तरी काही चालक पोलिसांच्या ताब्यात आहेत. अपघातानंतर काही चालक अजूनही फरार आहेत. त्यामुळे पुण्यामध्ये अक्षरशः मृत्यूचे तांडव सुरू आहे.