TOP Newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

ठाकरे गटाला मोठा दिलासा! न्यायालयाच्या दणक्यानंतर BMC ने स्वीकारला लटकेंचा राजीनामा

मुंबई | अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या ३ नोव्हेंबरला होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाची उमेदवारी मिळालेल्या ऋतुजा लटके यांचा राजीनामा मुंबई महानगरपालिकेने स्वीकारला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राजीनामा स्वीकृती पत्र पालिकेने लटके यांना दिलं आहे. त्यामुळे आज लटके यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या मार्गातील सर्व अडथळे दूर झाले आहेत. आज दुपारी १२ च्या आसपास लटके या आपला उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत.

महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागातील प्रमुख कर्मचारी अधिकारी कार्यालयाकडून हे पत्र देण्यात आलं आहे. लटके या महानगरपालिकेमध्ये कार्यकारी सहाय्यक (लिपीक) पदावर कार्यरत होत्या. लटके या २००६ पासून महानगरपालिकेच्या सेवेत होत्या. परंतु पती रमेश लटके यांच्या निधनानंतर त्यांना अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणूक लढवण्यासाठी ठाकरे गटातर्फे उमेदवारी देण्यात आली. त्यांचाही ही पोटनिवडणूक लढवण्याचा मानस आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आजची म्हणजेच १४ ऑक्टोबरची आहे.  पोटनिवडणूक लढवता यावी यासाठी आपण ३ ऑक्टोबर रोजी महानगरपालिकेकडे राजीनामा सादर केला होता. तसेच त्यासाठीच्या सर्व औपचारिकताही पूर्ण केल्या. परंतु आजपर्यंत महानगरपालिका प्रशासनाने त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही आणि आवश्यक ते आदेश काढलेले नाहीत. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, नोकरीचा राजीनामा दिला तरच लटके या निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करू शकत होत्या. त्यामुळेच त्यांनी उच्च न्यायालयालामध्ये पालिकेने तातडीने राजीनामा स्वीकारावा असे आदेश देण्यासंदर्भातील याचिका दाखल केली होती. न्यायालयाने लटके यांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर पालिकेने राजीनामा स्वीकारला आहे

लटके यांचा राजीनामा न स्वीकारण्याचा मुंबई पालिकेचा निर्णय मनमानी असल्याचे ताशेरे उच्च न्यायालयाने गुरुवारी ओढले. लटके यांचा राजीनामा तातडीने स्वीकारा आणि तसे पत्र त्यांना शुक्रवारी सकाळी ११ वाजेपर्यंत द्या, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने पालिकेला दिले होते. त्यानुसार पालिकेने कालच म्हणजे उच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर राजीनामा स्वीकारण्यात आल्याचं पत्रात म्हटलं आहे.

पत्रात काय म्हटलं आहे?
राजीनामा स्वीकृतीबाबत असा या पत्राचा विषय आहे. तर पत्राच्या मजकुरामध्ये, “आपण १२ ऑक्टोबर २०२२ रोजी माननिय उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकाच्या अनुषंगाने, न्यायालयातील न्यायमूर्ती नितीन जामदार तसेच न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने १३ ऑक्टोबर रोजी पारित केलेल्या आदेशानुसार आपल्या उपरोक्त विषयासंदर्भात दिनांक ३ ऑक्टोबर रोजीच्या अर्जाबाबत कळविण्यात येते की. आपला बृहन्मुंबई महानगरपालिकेचा राजीनामा १३ ऑक्टोबर २०२२ (कार्यालयीन वेळेनंतर) पासून स्वीकृत करण्यात येत आहे,” असं म्हटलं आहे.

आज अर्ज भरणार, विरोधात भाजपाचा उमेदवार
न्यायालयाच्या निर्णय आणि त्यानंतर मिळालेल्या या पत्रामुळे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा ऋतुजा लटके यांचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार म्हणून आज त्या अर्ज दाखल करणार आहेत. या जागेवर भाजपा की, ‘बाळासाहेबांची शिवसेना’ लढणार, याबाबतच्या संभ्रमावरही गुरुवारी रात्री उशीरा पडदा पडला. भाजपाने मुरजी पटेल यांना निवडणुकीचं तिकीट दिलं आहे.

.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button