breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

मोठी बातमी! नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात शरण

सिंधुदुर्ग |

सुप्रीम कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर भाजपाचे आमदार नितेश राणे जिल्हा न्यायालयात हजर झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी नितेश राणे यांचा अटकूपर्व जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने गुरुवारी फेटाळला. यावेळी सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयात शरण जाण्यास तसंच नियमित जामिनासाठी अर्ज करावा असे निर्देश दिले होते. यासाठी कोर्टाने नितेश राणे यांना १० दिवसांची मुदत दिली होती. तसंच तोपर्यंत त्यांना अटक करु नये असे निर्देश देत दिलासा दिला होता.

सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार, नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात हजर झाले. यावेळी त्यांचे बंधू माजी खासदार निलेश राणेही सोबत आहेत. यावेळी नितेश राणे नियमित जामीनसाठी अर्ज करतील. नितेश राणेंसोबत त्यांचे वकील सतीश मानशिंदेही उपस्थित आहेत. त्यामुळे नितेश राणेंना दिलासा मिळणार की कारवाई होणार हे पहावं लागणार आहे. नितेश राणेंनी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयातही नितेश राणेंना जामीन नाकारण्यात आला. त्यानंतर नितेश राणेंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टाकडूनही नितेश राणे यांना दिलासा मिळालेला नाही. कोर्टाने नितेश राणेंना योग्य कोर्टात दाद मागावी असा सल्ला दिला.

नितेश राणे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद केला. तर सरकारच्या बाजूने अभिषेक मनू सिंघवी कोर्टात उपस्थित होते. नितेश राणेंना चुकीच्या पद्धतीने अडकवण्यात आलं असल्याचा दावा यावेळी मुकुल रोहतगी यांनी केला. तसंच पेपर कटरने जीवे मारण्याचा उल्लेख झाला असून हे शक्य आहे का? अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली. ज्यांची नावं आहेत त्यांच्याशी संपर्क झाल्याचा कोणताही पुरावा नसून, आदित्य ठाकरेंना डिवचल्याप्रकरणी कारवाई करण्यात आल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला. अभिषेक मनू सिंघवी यांनीदेखील कोर्टात युक्तिवाद करताना नितेश राणे यांच्यावर आतापर्यंत असलेले गुन्हे फक्त राजकीय नसून इतरही आहेत असं सांगितलं. पैशांची देवाणघेवाण, षडयंत्र याचा तपास होणं गरजेचं आहे यामुळे जामीन मिळू नये असा युक्तिवाद त्यांनी केला. यानंतर कोर्टाने नितेश राणे यांना संबंधित कोर्टात शरण व्हावं असे निर्देश दिले असून त्या १० दिवसांत अटक केली जाऊ नये असं स्पष्ट केलं.

  • काय आहे संतोष परब हल्ला प्रकरण…

जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांना १८ डिसेंबरला कणकवलीत मारहाण झाली. संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला करणारा मुख्य आरोपी सचिन सातपुते याला सिंधुदुर्ग पोलिसांनी दिल्लीहून अटक केली. त्याने चौकशीदरम्यान नितेश राणे यांचं नाव घेतलं. नितेश राणे यांची याप्रकरणी कणकवली पोलिसांकडून चौकशीदेखील करण्यात आली. यानंतर शिवसेना आक्रमक झाली होती.

“मतदारांवर दबाव आणण्यासाठी १८ तारखेला महाविकास आघाडीच्या प्रचारप्रमुखावर हल्ला झाला. त्या हल्ल्यात फिर्यादीने नितेश राणेंचं नाव घेतलं होतं. पोलीस तपासात नितेश राणे दोषी आढळल्याचं प्राथमिकदृष्ट्या स्पष्ट झालं आहे. त्यामुळे त्यांना अटक झाली पाहिजे. दोषी असतील तर त्यांना अटक होईल. पण केंद्रीय मंत्री नारायण राणे आपल्या मंत्रीपदाचा फायदा घेत दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत,” असा आरोप शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.

  • संतोष परब यांचा आरोप काय होता…

“दुचाकीवर असताना मला जोरात एका गाडीने धडक दिली. ती धडक इतकी जोरात होती की त्यामुळे मी रस्त्याच्या बाजूने फरफटत गेलो. माझ्या हाताला जखमही झाली आहे. फरफटत जाऊन मी एका बाजूला पडलो होतो आणि माझी दुचाकी माझ्या पायावर होती. ती एक सिल्व्हर रंगाची इनोव्हा होती. पुढे जाऊन २०-२५ फुटांवर जाऊन थांबली. त्यातील एक व्यक्ती माझ्याजवळ आला आणि जाताना गोट्या सावंत, नितेश राणे यांना कळवलं पाहिजे असं म्हणत खिशातून मोबाईल काढला,” असं संतोष परब यांनी सांगितलं होतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button