breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भोसरीकरांचा हरकतींचा पाऊस : भाजपा-राष्ट्रवादीतील संभाव्य पक्षप्रवेश आणखी लांबणीवर !

पिंपरी । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत प्रारुप प्रभागरचनेचा आराखडा जाहीर झाला. त्या रचनेवर भोसरीतील भाजपा-राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी हरकतींचा अक्षरश: पाऊस पाडला. परिणामी, दोन्ही पक्षांत पक्षांतर करण्याच्या मन:स्थितीत असलेल्या नगरसेवकांनी आपला निर्णय लांबणीवर टाकला आहे.

शहरभरातून ४ दिवसांत एकूण ५ हजार ६६४ हरकती पालिकेच्या निवडणूक विभागास प्राप्त झाल्या आहेत. त्यावर दि.२५ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे, एवढ्या प्रमाणात आलेल्या हरकतींबाबत संबंधितांना आधार कार्ड आणि पॅनकार्ड स्वत:च्या स्वाक्षरीचा अर्ज दाखल करावा लागतो. त्यामुळे प्रभाग रचनेबाबत भोसरीकर कमालीचे जिज्ञासू असल्याचे दिसत आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेचा प्रारुप प्रभागरचना आराखडा १ फेब्रुवारी प्रसिद्ध करण्यात आला. त्यावर सोमवारपर्यंत (दि.१४) पर्यंत सूचना व हरकती स्विकारण्यात आल्या. एकच प्रभाग आणि विशिष्ट कारण असलेल्या हरकती एकत्रित केल्या जाणार आहेत. तसेच हद्द, वर्णन, नाव व इतर कारणांसाठी असलेल्या हरकतींचे दोन दिवसांत वर्गीकरण केले जाणार आहे. हरकतींचा अहवाल बुधवारपर्यंत (दि.१६) राज्य निवडणूक आयोगाकडे तसेच, सुनावणीचे प्राधिकृत अधिकारी अनिल कवडे यांच्याकडे पाठविला जाणार आहे. तसेच शुक्रवारी (दि.२५) हरकतीवर सुनावणी होणार आहे. सुनावणीचा अहवाल २ मार्चला राज्य निवडणूक आयोगास महापालिकेकडून सादर केला जाणार आहे. मागील फेब्रुवारी २०१७ च्या निवडणुकीत एक हजार ४०० हरकती प्राप्त झाल्या होत्या.

प्रारुप प्रभागरचनेवर शहरातील सर्वाधिक हरकती भोसरी विधानसभा मतदार संघातील प्रभागातून नोंदविण्यात आल्या. यामध्ये प्रभाग क्रमांक १, ५, ६, ७, ८, ९, १०, १४ या प्रभागांचा समावेश आहे. तसेच, ४२ आणि ४३ प्रभागासंदर्भात हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. एकसंध भाग नसणे, दुसरीकडे जोडलेला भाग पुन्हा प्रभागास जोडा, एखादी वस्ती काढा किंवा समाविष्ट करा, या प्रकारच्या सर्वाधिक हरकती नोंदविण्यात आल्या आहेत.एकच प्रभाग व एकाच कारणांच्या हरकतींवर एकाच वेळी सुनावणी केली जाणार आहे. ती हरकत घेणाऱ्यांना त्यावेळी उपस्थित रहावे लागणार आहे. तसेच, हद्द, वर्णन, नाव व इतर कारणांच्या हरकती एकत्रित करून त्यांना सुनावणीस बोलाविले जाणार आहे. सुनावणीनंतर त्यांना उत्तरे दिली जाणार नाहीत, असे सहायक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी सांगितले.

प्रभाग रचनेत हस्तक्षेप करणाऱ्यांचे धाबे दणाणले…

चऱ्होली प्रभाग क्रमांक ५, दिघी-बोपखेल प्रभाग क्रमांक ६, भोसरी गावठाण प्रभाग क्रमांक ८, इंद्रायणीनगर, गव्हाणेवस्ती प्रभाग क्रमांक १०, तसेच, कासारवाडी प्रभाग क्रमांक ४२ आणि दापोडी प्रभाग क्रमांक ४३ या प्रभागांसंदर्भात सर्वाधिक हरकती प्राप्त झाल्या आहेत. एक हजार ते दीड हजारांच्या संख्येने हरकतींचे गठ्ठे सादर करण्यात आले आहेत.  हजारांच्या संख्येत हरकती सादर करण्यात आल्या आहेत. प्रत्येक हरकतीसाठी संबंधित अर्जदाराला आधार कार्ड आणि मतदान कार्ड द्यावे लागते. किंबहुना अशाच हरकती स्विकारल्या जातात. निनावी किंवा कागदपत्रे नसलेल्या हरकती स्विकारल्या जातात. अधिकृत हरकतींबाबत संबंधिताना बोलावून सुनावणी केली जाते. आता प्रभाग रचनेबाबत भोसरीतील प्रभागांमधून सुमारे ५ हजार हरकती सादर झाल्या आहेत. त्यामुळे पाच हजार कुटुंबाचा विचार केल्यास प्रत्येक कुटुंबातील ४ मतदार गृहित धरल्यास सुमारे २० हजार मतदार प्रारुप प्रभाग रचनेबाबत नाराज असल्याचे लक्षात येते. परिणामी, प्रभाग रचनेत हस्तक्षेप करणाऱ्या कथित चाणक्यांना नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागू शकतो. या धास्तीमुळे प्रभाग रचनेत हस्तक्षेप करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

….तोपर्यंत पक्षप्रवेश लांबणीवर !

हरकतींवर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर त्यांचा अहवाल २ मार्चला राज्य निवडणूक आयोगास सादर केला जाणार आहे. त्यानंतर आठवडाभरात अंतिम प्रभागरचनेचा आराखडा जाहीर केला जाणार आहे. त्यावरून हरकतींची दखल घेतली किंवा नाही हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे संभ्रमावस्थेत असलेल्या इच्छुकांना आपआपल्या प्रभागात काम करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. तसेच, प्रभागनिहाय मतदारयादीचे काम २८ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे भाजपा आणि राष्ट्रवादीतील नाराजांच्या पक्षप्रवेशाला २ मार्चनंतरच मुहूर्त सापडणार आहे. त्यामुळे पक्षप्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या नेत्यांना देव पाण्यात ठेवावे लागणार आहेत.

…तर भोसरीकर उच्च न्यायालयात दाद मागणार!

गावठाण तोडल्यामुळे हरकतींची संख्या वाढली आहे. भोसरीकरांची अस्मिता जागी झाली. नगरसेवक आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्याप्रमाणात हरकती दाखल केल्या आहेत. याबाबत भाजपाचे विधानसभा प्रभारी विजय फुगे यांनी आम्ही हरकती दाखल करणार आहोत, असे स्पष्ट केले होते. त्याचबरोबर  दिघी हा एकसंघ परिसर आहे. दिघीचा काही भाग मोठे क्षेत्रफळ असणाऱ्या चऱ्होलीला जोडण्यापेक्षा दिघीचा भाग दिघीतच ठेवणे किंवा दिघीला सलग्न असलेल्या भोसरीला जोडणे अपेक्षीत आहे.  २०१७ च्या निवडणुकीत तळवडे येथील ग्रामस्थांनी तळवडे गावठाण उपनगरांपासून तोडल्यामुळे हजाराहून हरकती दाखल झाल्या होत्या. त्यापेक्षा विक्रमी हरकती आता दाखल झाल्या आहेत. याची दखल निवडणूक आयोगाला निश्चितपणाने घ्यावी लागेल. आम्ही हरकती आणि सूचना दिल्या आहेत, निवडणूक विभागाने दखल न घेतल्यास याबाबत उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत, अशी भूमिका नगरसेवक विकास डोळस यांनी मांडली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button