breaking-newsआंतरराष्टीय

AugustaWestland Deal: “दुबईच्या राजकन्येच्या मोबदल्यात ख्रिश्चियन मिशेलचे प्रत्यार्पण”

हेलिकॉप्टर घोटाळ्यातील दलाल ख्रिस्तियन मिशेल याला दुबईतून ताब्यात घेण्यात यश आले असले तरी या प्रकरणात आता मिशेलच्या वकिलांनी नवा आरोप केला आहे. दुबईने त्यांच्या राज्यकन्येच्या मोबदल्यात मिशेलला भारताच्या ताब्यात दिले, असा दावा वकिलांनी केला असून हे प्रकरण आता संयुक्त राष्ट्रापुढे नेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

3600 कोटी रुपयांच्या ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी गैरव्यवहार प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आलेला दलाल ख्रिस्तियन मिशेल यांना दुबईत अटक करण्यात आली होती. संयुक्त अरब अमिरातीतून प्रत्यार्पण करण्यात आल्यानंतर डिसेंबर महिन्यात मिशेलला भारतात आणण्यात आले होते.

आठ महिन्यांपूर्वी दुबईची राजकन्या शेख लतिफाला भारताच्या तटरक्षक दलाने पकडून दुबईच्या ताब्यात दिले होते. लतिफा ही घरातून पळाली होती आणि गोवामार्गे अमेरिकेत जाण्याची योजना आखत होती. मात्र, मोदी सरकारनं आखाती देशांशी असलेल्या धोरणात्मक संबंधांचा विचार करून दुबईला मदत केली होती. तटरक्षक दलाने लतिफाला ताब्यात घेतले व तिला तिच्या मैत्रिणीसह दुबईच्या स्वाधीन केले होते.

या दोन्ही घटनांचा संबंध जोडला जात आहे.  ‘संडे टेलिग्राफ’ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.  भारत आणि दुबईत 2011 मध्ये प्रत्यार्पण करार झाला आहे. यानुसार दोन्ही देशातील नागरिकांचे प्रत्यार्पण करता येते. मात्र, या प्रकरणात मिशेल हा ब्रिटनचा नागरिक आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन झाल्याचा दावा सूत्रांनी संडे टेलिग्राफशी बोलताना केला आहे.

लतिफासाठी दुबईतील राजे शेख मोहम्मद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवरुन चर्चा केली होती. यानंतर तटरक्षक दलाने लतिफाला पकडून दुबईत परत पाठवले होते. याची परतफेड करण्यासाठीच दुबईने मिशेलला भारताच्या ताब्यात दिल्याचा अंदाज सूत्रांनी संडे टेलिग्राफशी बोलताना वर्तवला.

मानवी हक्कासंदर्भातील प्रख्यात आंतरराष्ट्रीय कायदेतज्ज्ञ टॉबी कॅडमन हे आता मिशेल यांच्या कुटुंबीयांना यासंदर्भात मार्गदर्शन करत आहेत. कॅडमन यांनीच दुबईची राज्यकन्या लतिफाचे प्रकरण संयुक्त राष्ट्रात नेले होते. आता ते मिशेल यांचे प्रकरणही संयुक्त राष्ट्रासमोर नेणार आहेत.

सामाजिक कार्यकर्त्या राधा स्टर्लिंग यांनी सांगितले की, दुबईच्या राज्यकन्येला पकडण्यात भारताने मदत केली होती आणि या बदल्यात दुबईने मिशेलला भारताच्या ताब्यात दिले असावे. यूएई आणि भारतामधील संबंध सुधारत आहे. यूएईला मनुष्यबळ पुरवण्याचे काम भारत करत आहे. तर व्यापाराच्या दृष्टीने यूएईसाठी भारत महत्त्वाचा आहे. यूएईला जागतिक स्तरावरील प्रभाव वाढवायचा असून भारतासोबत धोरणात्मक संबंध सुधारण्यावर त्यांचा भर आहे, असे राधा यांनी सांगितले. गुन्ह्यांचा तपास आणि प्रत्यार्पणाची प्रक्रिया यात राजकारण व्हायला नको, असेही त्यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button