ताज्या घडामोडीमुंबईराजकारण

अजितदादांना धक्का, लेकानंतर पत्नी पराभूत

काका विरुद्ध पुतण्या लढाईत काकांनी बाजी मारली

पुणे : तू निवडून कसा येतो तेच बघतो, तू आमदार कसा होतो तेच बघतो, अशा धमक्या, इशारे देणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांना बारामतीत, त्यांच्याच होम ग्राऊंडवर धक्का बसला आहे. काकांसोबत फारकत घेऊन पक्षावर दावा करणाऱ्या, पक्षासह चिन्ह मिळवणाऱ्या अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामतीमध्ये पराभूत झाल्या आहेत. नणंदबाई सुप्रिया सुळेंनी त्यांचा लाखापेक्षा अधिक मतांनी पराभव केला.

बारामतीत यंदा प्रथमच पवार विरुद्ध पवार असा संघर्ष झाला. काकांची साथ सोडून महायुतीमध्ये गेलेल्या, उपमुख्यमंत्रिपद मिळवणाऱ्या अजित पवारांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामतीमधून उमेदवारी दिली. त्यांच्यासमोर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळेंचं आव्हान होतं. नणंद विरुद्ध भावजय या संघर्षाला काका विरुद्ध पुतण्या संघर्षाचीदेखील किनार होती. अजितदादांनी मतदारसंघात जातीनं लक्ष घातलं. आपली सगळी यंत्रणा त्यांनी कामाला लावली.

काका विरुद्ध पुतण्या लढाईत काकांनी बाजी मारली. सुप्रिया सुळेंनी सलग चौथ्यांदा बारामतीमधून निवडणूक जिंकली. आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये कायम सोबत असलेले अजित पवार यंदा थेट विरोधात असल्यानं सुळेंसाठी आव्हान होतं. पण शरद पवारांनी लेकीसाठी आपला संपूर्ण राजकीय अनुभव पणाला लावला. राजकारणातील पैलवान असलेल्या शरद पवारांनी पुतण्याला अस्मान दाखवलं.

बारामतीत पत्नीचा झालेला पराभव अजित पवारांसाठी जास्त धक्कादायक आहे. राजकीय विरोधकांना थेट इशारे देणारे, तू निवडून कसा येतो तेच बघतो म्हणणारे अजित पवार त्यांच्या कुटुंबातील दोन सदस्यांना निवडून आणू शकलेले नाहीत. गेल्या निवडणुकीत अजित पवारांनी त्यांचा मुलगा पार्थला मावळमधून तिकीट दिलं. शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंनी पार्थ पवारांचा तब्बल २ लाख १५ हजार ९१३ मतांनी पराभव केला. पार्थ यांच्यामुळे पवार कुटुंबाला निवडणुकीच्या राजकारणात पहिल्यांदाच पराभव पाहिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button