breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘आम्ही कमी पडलो म्हणून हारलो’, अजित पवार यांची माध्यमांसमोर पहिली प्रतिक्रिया

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांसोबत बैठक घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. या निमित्ताने अजित पवार लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या पराभवावर प्रतिक्रिया दिली. “एनडीएला बहुमताचा आकडा गाठता आला आहे. जो काही निकाल लागला आहे त्यामध्ये आम्ही काही फार समाधानी नाहीत. या निकालाची सर्वस्व जबाबदारी माझी आहे हे मी मान्य करतो. कारण जनतेने दिलेला कौल आहे. आम्ही जनतेचा विश्वास संपादन करण्यात कुठेतरी कमी पडलो हे आम्हाला मान्यच करावं लागेल. जे काही अपयश आलं आहे त्याची जबाबदारी मी स्वत: स्वीकारली आहे”, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.

“आम्ही सर्वांना बोलवण्यामागील कारण म्हणजे  काही प्रमुख नेत्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत सर्व मंत्री होते, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, रामराजे निंबाळकर असे आम्ही सर्वजण बसलो होतो. आम्ही आज संध्याकाळी आमच्या सर्व आमदारांना एकत्र बोलावलेलं होतं. त्यातील काही जण त्यांच्या अडचणींमुळे येऊ शकले नाहीत. बाबा आत्रामांचं ऑपरेशन झालं आहे. कुणाच्या काही दुखद घटना घडल्या आहेत, अशा काही कारणास्तव ते येऊ शकले नाहीत. पण जे येऊ शकले नाहीत त्यांनी सुद्धा फोनवर संपर्क साधला”, असं अजित पवार यांनी सांगितलं.

“जे सातत्याने बातम्या देण्याचा प्रयत्न मीडियामध्ये पाहतोय, आमचे कुणीतरी विरोधक म्हणत आहेत की, यांनी संपर्क साधला, त्यांनी संपर्क साधला. असं काही झालेलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार आमच्यासोबत आहेत. हे अतिशय स्पष्ट चित्र आज पाहायला मिळालं आहे. अर्थात विरोधकांनी काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे. मला बाकी लोकांच्याबद्दल काही बोलायचं नाही. पण बारामतीचादेखील जो कौल आहे तो कौल, जो काही निकाल लागला आहे त्याबद्दल मी स्वत: आश्चर्य झालेलो आहे. मलाही समजत नाही की, गेल्या अनेक वर्ष मी तिथे काम करतोय. बारामतीकरांनी मला नेहमी पाठिंबा दिलेला होता. यावेळेस कशामुळे त्यांनी मला पाठिंबा दिला नाही, बाकीचे मतदारसंघ तर बाजूलाच राहुद्या”, असं अजित पवार म्हणाले.

हेई वाचा – मालदीवला संबंध सुधारण्याची संधी, नरेंद्र मोदींच्या शपथविधीचे मिळाले निमंत्रण

“शेवटी जनतेचा कौल असतो, तो कौल लोकशाहीत स्वीकारायचाच असतो. पुन्हा ना उमेद न होता लोकांसमोर जायचं असतं. मी कार्यकर्त्यांना नेहमीच सांगतो की, यश मिळालं म्हणून हुरळून जायचं नसतं तर किंवा अपयश मिळालं म्हणून खचून जायचं नसतं. पुन्हा नव्या उमेदीने सगळ्यांनी काही महिन्यांनी येणाऱ्या निवडणुकीत सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. आमची साहजिकच महायुती आहे, या महायुतीत जे प्रमुख आहेत, त्यांच्याशी चर्चा करुन जागावाटप करु”, असं अजित पवारांनी सांगितलं.

“मागे लोकसभेच्या चर्चांवेळी कुठे आम्ही कमी पडलो, हे समजलं. यावेळेस आम्हाला जाणवलं की, मुस्लिम समाज आमच्यापासून दूर गेलेला होता. विरोधकांनी संविधान बदलणार असल्याचा प्रचार केला. त्या प्रचाराला मागासवर्गीय समाजाने थोडा-बहुत प्रतिसाद दिला. मागासवर्गीय समाजात तसा प्रचार बिंबवण्यात विरोधक यशस्वी झाले. तसेच आरक्षणाचा मुद्दाही कारणीभूत ठरला. मराठवाड्यात संभाजीनगरची जागा सोडली तर एकही जागा महायुतीत येऊ शकली नाही. अशा अनोक गोष्टी निकाल पाहिल्यानंतर आणि आमदारांशी चर्चा केल्यानंतर पुढे आल्या”, असं अजित पवार म्हणाले.

“यातून आम्हाला जी नोंद घ्यायला पाहिजे, ज्यातून आम्हाला काही निर्णय घ्यावे लागतील ते घेण्यासाठी आमची पुढची वाट असेल. या दोन-तीन गोष्टींचा फटका आम्हाला बसला आहे. जनता जनार्धन असते. जनतेने दिलेला विनम्र कौल आम्ही स्वीकारलेला आहे. त्यांच्या आमच्याबद्दलचा जो विश्वास कमी झालेला आहे तो विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी आम्ही जीवाचं रान करु”, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button