breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

अजित पवारांचं नेतेमंडळींना आवाहन; म्हणाले, “राज्यातलं बदललेलं वातावरण मला स्वत:ला पटत नाही”!

मुंबई |

गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये अनेक गोष्टींवरून राजकीय वातावरण ढवळून निघताना पाहायला मिळत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांमुळे त्या वादाला रोज नवनवीन फोडणी देखील मिळत आहे. नुकतीच ईडीनं राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना केलेली अटक आणि त्यापाठोपाठ मुंबई महानगर पालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर प्राप्तीकर विभागानं केलेली छापेमारी यावरून आरोप-प्रत्यारोपांचा नवा अंक राज्यात सध्या दिसत आहे.

मात्र, गेल्या काही काळामध्ये राज्यातल्या बदललेल्या राजकीय वातावरणामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. रायगडमधील रोह्यामध्ये आज चिंतामणराव देशमुख सभागृहाचं भूमिपूजन अजित पवार यांच्या हस्ते पार पडलं. या भूमिपूजन सोहळ्यावेळी अजित पवारांनी केलेल्या भाषणात राज्यातील राजकीय परिस्थितीविषयी भाष्य केलं. “सध्या राज्यात वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार झालं आहे. पण मला स्वत:ला ते पटत नाही. आपला सुसंस्कृतपणा आपण जपला पाहिजे”, असं अजित पवार म्हणाले.

  • “नव्या पिढीला वाटत असेल की…”

“सध्या एकमेकांचे वाभाडे काढण्याचं, एकमेकांविषयी हीन वक्तव्य करण्याचं काम सुरू आहे. एकानं एक विधान केलं की दुसऱ्यानं दुसरं करायचं. त्यातून नवीन पिढीला वाटतं की हे राजकारणी काय बोलतायत. कोणत्या पद्धतीने कुणाला छळलं जात आहे? असलेल्या सत्तेचा वापर कसा केला जातोय? हे सगळं आज उभा महाराष्ट्र बघतोय. पण ही महाराष्ट्राची परंपरा नाही”, अशा शब्दांत अजित पवार यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

  • नेतेमंडळींना अजित पवारांचं आवाहन

“प्रत्येकानं आपल्या अशा बोलण्याला कुठेतरी आवर घातला पाहिजे. कुठेतरी थांबलं पाहिजे. वैचारिक मतभेद असू शकतात. आपापल्या भूमिका मांडण्याचा अधिकार आपल्या सगळ्यांना घटनेनं दिला आहे. पण त्यातून आपण चुकीचं काही वागता कामा नये”, असं आवाहन यावेळी अजित पवार यांनी केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button