breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

कर्नाटक निवडणूक : राष्ट्रवादीच्या ‘स्टार प्रचारक’ यादीतून अजित पवार, अमोल कोल्हेंना वगळले!

राज्यातील राजकारणात पुन्हा नवी चर्चा : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनाही बगल

पुणे । विशेष प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची राष्ट्रीय पक्ष ही मान्यता रद्द झाली. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाला आपली मतांची टक्केवारी वाढवावी लागणार आहे. त्यादृष्टीने कर्नाटक विधानसभा निवडणूक महत्त्वपूर्ण असताना आणि महाराष्ट्रात अजित पवार यांच्या नावाची ‘मोठी क्रेझ’ असतानाही या निवडणुकीतील ‘स्टार प्रचारक’ यादीतून अजित पवार यांचे नाव वगळण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतून घरोघरी पोहोचलेले शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नावाचाही ‘स्टार प्रचारक’ यादीत उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीतील ‘शितयुद्धा’बाबत पुन्हा नवी चर्चा सुरू झाली आहे.

लोकसभेची निवडणूक अवघ्या वर्षभरावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे कर्नाटक विधानसभा निवडणुकीला ‘मिनी लोकसभा’ निवडणूक मानण्यात येत आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने संपूर्ण ताकद मैदानात उतरवली आहे. तब्बल ४० स्ट्रार प्रचारक भाजपाच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. दुसरीकडे, भाजपाला कवडे आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे गट, काँग्रेसही पुढे सरसावले आहेत. कर्नाटक निवडणुक राष्ट्रवादी काँग्रेससाठी महत्वाची ठरणार आहे. या निवडणुकीत पक्ष तयारीला लागला असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ उमेदवारांची यादी पक्षाने प्रसिद्ध केली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय मान्यता काढून घेतली आहे. त्यामुळे हा पक्ष आता राज्य पक्ष झाला आहे. अशावेळी कनार्टक येथील विधानसभा लढवून काही जागा जिंकून आल्यास पुन्हा राष्ट्रीय पक्ष होण्याच्या दृष्टीने वाटचाल करता येईल यासाठी ही निवडणूक राष्ट्रवादीसाठी महत्वाची आहे. यासाठी पक्षाने स्टार प्रचारकांसह पहिल्या नऊ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

भाजपने कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील केंद्रीय नेते नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नावे जाहीर केली आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या स्टार प्रचारकांच्या यादीतून माजी उपमुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे नाव वगळले आहे.

राष्ट्रवादीत दोन गट?

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांची भूमिका आणि पक्षाची भूमिका यात विरोधाभास पहायला मिळत आहे. अजित पवार भाजपासोबत युती करण्याबाबत आग्रही आहेत, असे सांगितले जाते. तसेच, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यात मतभेद असल्याचे दिसते. त्यामुठे ठाकरे गट आणि राष्ट्रवादीत दुरावा निर्माण होवू लागला आहे. त्यातच काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी मुंबई महापालिका स्वबळावर लढवणार असल्याचा दावा केला आहे. अजित पवार नाराज असल्याच्या बातम्या येत असतानाच राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची शिबीर झाले. त्या शिबिराला अजित पवार नव्हते. तर अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमधील मुलाखतीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. या मुलाखतीमध्ये आपण मुख्यमंत्रीपदासाठी दावेदार असल्याची रोखठोक भूमिकाही मांडली. त्यामुळे पुण्यात ‘‘जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’’ असे बॅनर झळकले. परिणामी, राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाले आहेत, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.

डॉ. अमोल कोल्हे राष्ट्रवादीवर नाराज?

दरम्यान, शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे गेल्या काही दिवसांपासून पक्षाच्या संघटनात्मक कार्यक्रमापासून दूर आहेत. तसेच, भाजपाशी जवळीक वाढत्याची चर्चा आहे. ‘व्हाय आय किल्ड गांधी’ चित्रपटातील नथूराम गोडसे यांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीसह पुरोगामी विचारसरणीचा मतदार त्यांच्यावर असमाधानी आहे. यासह मतदार संघातील राष्ट्रवादीचे स्थानिक नेते आणि पदाधिकारीही कोल्हे यांच्याबाबत अनकूल नाही, असे सांगितले जाते. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीर डॉ. कोल्हे यांना स्ट्रार प्रचारक यादीतून बाजूला ठेवण्यात आले असावे, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

स्टार प्रचारकांची यादी पुढीलप्रमाणे :

शरद पवार – राष्ट्रीय अध्यक्ष
प्रफुल्ल पटेल – राष्ट्रीय उपाध्यक्ष
पी पी मोहम्मद फैजल – राष्ट्रीय सरचिटणीस
सुप्रिया सुळे – खासदार
डॉ. (श्रीमती) फौजिया खान – राष्ट्रीय अध्यक्ष NMC
धीरज शर्मा – अध्यक्ष, NYC
सुश्री सोनिया डूहान – अध्यक्ष, NSC
सिराज मेहदी – अध्यक्ष, राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभाग
शिवाजीराव गर्जे – जनरल सेक्रेटरी, महाराष्ट्र
आर हरी – अध्यक्ष, कर्नाटक राष्ट्रवादी काँग्रेस
प्रदीप कुमार – उपाध्यक्ष, कर्नाटक राष्ट्रवादी
उमा महेश्वर रेड्डी – जनरल सेक्रेटरी, कर्नाटक राष्ट्रवादी
रामभाऊ जाधव – जनरल सेक्रेटरी, कर्नाटक राष्ट्रवादी
ब्रिजमोहन श्रीवास्तव – राष्ट्रीय सचिव आणि प्रवक्ते
क्लाईड क्रॅस्टो – राष्ट्रीय प्रवक्ते

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button