breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

“मोदींच्या तुलनेचा नेता आज लोकांसमोर नाही”, संजय राऊतांनी मांडली भूमिका; म्हणाले, “काँग्रेसनं पंजाब कायमचा गमावला”!

नवी दिल्ली |

देशात नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल काँग्रेससाठी निराशाजनक ठरले आहेत. पाचपैकी चार राज्यांमध्ये भाजपा सत्तेत बसणार हे स्पष्ट झालं आहे. तर उरलेल्या पंजाबमधून काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या कामगिरीवर टीका होत असताना दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या निवडणूक निकालांवरून भाजपावर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमधल्या निवडणूक निकालांबाबत सामनातील त्यांच्या रोखठोक सदरामध्ये भूमिका स्पष्ट केली आहे. यातून आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या १८ जागा कमी होणार असल्याचा निष्कर्ष त्यांनी मांडला आहे.

  • पाचपैकी चार राज्ये भाजपाने सहज जिंकली, पण…

भाजपानं चार राज्यांमध्ये विजय मिळवला असला, तरी त्यांचं काही प्रमाणात नुकसान झाल्याचंही विश्लेषण संजय राऊतांनी केलं आहे. “पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपानं चार राज्य सहज जिंकली. त्यात उत्तर प्रदेश जिंकल्याचा जल्लोष आजही सुरूच आहे. पण सीमेवरील पंजाब राज्यात भाजपाचं पूर्ण पानिपत का झालं? त्यावर कुणीच बोलत नाही. आपनं दिल्ली ते पंजाब हातपाय पसरले. गोव्यात ते शिरले. हे चित्र काय सांगतं?” असं राऊतांनी या लेखात म्हटलं आहे.

  • “प्रियांका गांधींनी थोडं आधी उतरायला हवं होतं”

दरम्यान, प्रियांका गांधी उत्तर प्रदेश निवडणुकांमध्ये जरा आधी उतरल्या असत्या, तर परिस्थिती बदलली असती, अशी भूमिका राऊतांनी मांडली आहे. “उत्तर प्रदेशवर भाजपानं पुन्हा वर्चस्व प्रस्थापित केलं. पण समाजवादी पार्टी ४२ वरून थेट १२५पर्यंत गेली. त्यांचे जवळपास १०० उमेदवार २०० ते ५०० मतांच्या फरकानं पराभूत झाले. त्यामुळे उत्तर प्रदेशात भाजपाला १८ जागा गमवाव्या लागतील हे आता स्पष्ट झालं आहे. प्रियांका गांधींनी मोदी-शाह यांच्यापेक्षा जास्त मेहनत घेतली. पण त्यांना जागा जिंकता आल्या नाहीत. त्यांनी थोडं आधी मैदानात उतरायला हवं होतं. पण आज त्या जे प्रयत्न करत आहेत, त्याचा फायदा त्यांना २०२४मध्ये होईल”, असं राऊत म्हणतात.

  • “नरेंद्र मोदींकडे देशाचे नेते म्हणून मतदार पाहातो”

“उत्तर प्रदेशातील वारे भाजपाविरोधी वाहात होते. तरी भाजपाला मतदान झालं. कारण मतदार नरेंद्र मोदींकडे देशाचे नेते म्हणून पाहातो. त्यांच्या तुलनेचा नेता आज लोकांसमोर नाही. मोदी निवडणुकांकडे उत्सव म्हणून पाहतात आणि या उत्सवात लोकांना सामील करून घेतात. मग हे लोक बेरोजगारी, महागाई, कायदा-सुव्यवस्था हे प्रश्न निवडणुकांपुरते विसरून जातात”, असा टोला देखील राऊतांनी लगावला आहे.

  • “काँग्रेसनं पंजाब कायमचा गमावला आहे…”

दरम्यान, काँग्रेसनं पंजाब कायमचा गमावल्याचं संजय राऊतांनी या लेखात म्हटलं आहे. “खरी लढाई भाजपासाठी पंजाबमध्ये होती. पण तिथून भाजपानं पळ काढला आणि जेमतेम दोन जागा जिंकल्या. शीख समाजानं पंजाबच्या भूमीवर अहंकाराचा पराभव केला. पंजाबात भाजपाला गमवायचे काहीच नव्हते. पण काँग्रेसनं पंजाब कायमचे गमावले आहे”, असं राऊतांनी नमूद केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button