TOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खंडणीसाठी डांबून ठेवलेल्या परप्रांतीय व्यापाऱ्याची पोलिसांंकडून सुटका

तीन लाखाच्या खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी देत तालुक्यातील भारदे नगरच्या जंगलात डांबून ठेवण्यात आलेल्या गुजरातच्या व्यापाऱ्याची नाट्यमयरित्या सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी दोघा खंडणीखोरांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले असले तरी त्यांच्या अन्य चार साथीदारांनी मात्र गुंगारा दिला आहे.

तामिळनाडूच्या मदुराई येथील मूळ रहीवासी व व्यवसायानिमित्त सध्या गुजरातच्या अहमदाबादेत असलेला मुरली रघुराज भंडारी (२४) हा तरुण व्यापारी गेल्या सोमवारी अहमदाबाद ते धुळे असा प्रवास करीत होता. त्यावेळी संशयितांनी त्याच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधत सुझलॉन कंपनीतील तांब्याचे भंगार कमी किंमतीत देण्याचे आमिष दाखविले. त्यास बळी पडल्याने धुळे बसस्थानकात उतरलेल्या या व्यापाऱ्यास संशयितांनी दुचाकीवर बसवत धुळे व नाशिक जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील भारदेनगर, डोंगराळे येथील जंगलाच्या निर्जनस्थळी नेले. तेथे मारहाण करत त्याच्याजवळील चार हजार रुपये रोख व घडयाळ हिसकावून घेण्यात आले. तसेच सुटकेसाठी तीन लाखाच्या खंडणीची मागणी करण्यात आली. ही मागणी पूर्ण न झाल्यास जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली. त्यानुसार मदुराई येथे मुरलीचा भाऊ नीलेश याच्याशी संपर्क साधून ‘फोन-पे’द्वारे खंडणीच्या रक्कमेची मागणी करण्यात आली.

नीलेशने नाशिकचे जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांना दूरध्वनीद्वारे या प्रकाराची माहिती दिली. घटनेचे गांभिर्य लक्षात घेता उमाप यांनी अपहृत व्यापाऱ्याच्या शोधार्थ कारवाई करण्याबाबत वेगाने चक्रे फिरवली. त्या अनुषंगाने नाशिक व धुळे येथील स्थानिक गुन्हे शाखा तसेच वडनेर-खाकुर्डी व तालुका पोलिसांच्या संयुक्त पथकाने नाशिक,धुळे जिल्हयाच्या सीमावर्ती भागातील जंगल व डोंगराळ परिसरात कसोशीने शोध घेत ही कारवाई फत्ते केली. अपहृत व्यक्तीला सटाणा परिसरात डांबून ठेवल्याची माहिती त्याच्या भावाला प्रारंभी समजलेली होती. त्या दृष्टीने प्रारंभी शोध मोहीम सुरु करण्यात आली. दरम्यान,पोलिसांच्या सूचनेनुसार अपहृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी खंडणीखोरांना ‘फोन-पे’द्वारे थोडी थोडी रक्कम पाठवणे सुरु ठेवले. या काळात तांत्रिक विश्लेषणाव्दारे खंडणीखोरांचा माग काढण्याचे प्रयत्न केले गेले. त्यानुसार अपहृत व्यापारी व खंडणीखोर हे भारदेनगर परिसरात असल्याचे स्थान निश्चित झाल्यावर नेमक्या ठिकाणी छापा टाकल्याने अपहृत व्यापाऱ्याची सुटका करण्यात पोलिसांना यश मिळाले.

या कारवाईत दादाराम भोसले (३६), बबलु उर्फ बट्टा चव्हाण (२८ दोघे रा. हेंकळवाडी, धुळे) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांचे साथीदार शामलाल पवार, लुकडया चव्हाण, मुन्ना भोसले व रामदास उर्फ रिझवान पवार (सर्व हेंकळवाडी, धुळे) हे मात्र पोलिसांची चाहूल लागताच जंगल व डोंगराळ भागाचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे व हेमंत पाटील, उप निरीक्षक एस.डी.कोळी, संदिप पाटील, सहाय्यक उप निरीक्षक विठ्ठल बागूल, हवालदार कुंवर, पोलीस नाईक देवा गोविंद, फिरोज पठाण, गणेश पवार, दत्ता माळी, किरण दुकळे आदींनी या कारवाईत भाग घेतला. या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक सयाजी उमाप यांनी तपास पथकास १० हजाराचे बक्षिस दिले आहे. या प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार संशयितांचा शोध सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button