breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारणलेख

उडाला तर कावळा; बुडाला तर बेडूक! माजी आमदार विलास लांडे यांची चाणक्यनिती

भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी कमालीची जवळीक पण…

पिंपरी । विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातील सर्वाधिक मुरब्बी म्हणा किंवा तेल लावलेला पहिलवान… माजी आमदार विलास लांडे यांच्या खेळीचा थांग पत्ता लागत नाही. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचा अनुभवी आणि प्रभावी चेहरा असतानाही लांडे यांनी भाजपाशी ‘कनेक्शन’ मजबूत केले आहे. मात्र, व्यवसायिक किंवा सांस्कृतिक भेटी-गाठींना राजकीय रंग देण्याचे कारण नाही, असा दावा त्यांनी केला आहे.

असे असले तरी, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लांडे यांनी भाजपाशी जवळीक राष्ट्रवादी काँग्रेससाठी धोक्याची घंटा आहे. राज्यात आणि केंद्रात भाजपाची सत्ता असल्यामुळे महापालिका निवडणुकीत सत्ता मिळण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे शहर राष्ट्रवादीचे मनोबल खचले असून, राजकीय संभाव्य संधीच्या शोधात लांडे यांनी सुरक्षित हालचाली सुरू केल्या आहेत, अशी दबक्या आवाजात चर्चा आहे.
वास्तविक, ‘‘ उडाला तर कावळा अन् बुडाला तर बेडूक’’ अशी मराठीमध्ये अत्यंत चपखल म्हण आहे. याचा अर्थ छापा आणि काटा दोन्हीही माझेच. त्यामुळे निकाल काहीही लागू दे विजेता मीच ठरणार… अशी ही खेळी किंवा चाणक्यनिती आहे. गेल्या काही दिवसांतील लांडे यांच्या भेटीगाठीतून हेच स्पष्ट होते.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांची काही दिवसांपार्वी लांडे यांनी भेट घेतली. प्रदेशाध्यक्षांच्या भेटी दरम्यान त्यांनी शहरातील प्रलंबित प्रश्नांसह महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा केल्याचे सोशल मीडियावर अधिकृतपणे सांगितले.
त्यानंतर भाजपाचे राज्यातील क्रमांक तीनचे निर्णायक नेते आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतल्याचे वृत्तही चर्चेत आले. त्यानंतर लांडे यांनी राजकीय प्रसंगावधान राखत ‘‘संबंधित भेट ही राजकीय नसून, शिक्षण संस्थेच्या कामासंदर्भात होती’’ असे ठामपणे सांगितले.
विशेष म्हणजे, माजी आमदार विलास लांडे यांच्या शिक्षण संस्थेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये मदत झाली आहे. विधी महाविद्यालयाच्या मान्यतेसाठी असलेला प्रस्ताव मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मंजूर करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचे सांगितले जाते. त्यामुळे लांडे यांनी भाजपाशी जवळीक वाढलेली आहे, असे निरीक्षण नोंदवले जात आहे.

‘‘मोगरा फुलला’’ कार्यक्रमात ‘कमळ’ फुलवण्याचा प्रयत्न?
दरम्यान, प्रसिद्ध व्याख्याते प्रा. गणेश शिंदे आणि गायिका सन्मिता शिंदे यांच्या ‘मोगरा फुलला’ या कार्यक्रमाचा ५०० वा प्रयोग भोसरीतील स्व. अंकुशराव लांडगे सभागृहात झाला. हा कार्यक्रम माजी आमदार लांडे यांची शिक्षण संस्था राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ आणि प्रबोधन परिवार यांच्या माध्यमातून आयोजित केला होता. या सांस्कृतिक कार्यक्रमाला राज्यातील किंवा केंद्रातील सांस्कृतिक मंत्र्यांना निमंत्रित केले नाही. याउलट, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील मंत्री म्हणून ज्यांना ओळखले जाते ते राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विश्वासातील अभ्यासू नेता अशी ओळख असलेले राज्यसभेचे खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे कार्यक्रमाचे अध्यक्ष उपस्थित होते. यासोबतच माजी मंत्री सुभाष देशमुख, संगीतकार अवधूत गुप्ते हेसुद्धा प्रमुख पाहुणे होते. देशाच्या राजकारणातील धुरंधर नेता असलेल्या शरद पवार यांचे पट्टशिष्य माजी आमदार विलास लांडे यांचे वारकरी सांप्रदायापासून सांस्कृतिक क्षेत्रापर्यंत सर्वांशी सलोख्याचे संबंध आहेत. प्रसिद्ध व्याख्याते प्रा. गणेश शिंदे यांच्याशी लांडेंचा असलेला स्नेह कौटुंबिक आणि सर्वश्रृत आहे. त्यामुळे ‘मोगरा फुलला’ कार्यक्रमाच्या निमित्ताने लांडे यांनी ‘कमळ’ फुलवण्यासाठी ‘साखर पेरणी’ केली असावी, असा अंदाज राजकीय जाणकार लावत आहेत.

विलास लांडे म्हणतात… हा सांस्कृतिक कार्यक्रम राजकीय नाही…
कला, क्रिडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात राजकारण आणू नये. मध्यंतरी शिक्षण संस्थेच्या निमित्ताने राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. आता भोसरीत कार्यक्रम होता. प्रा. शिंदे यांच्याशी स्नेह आहे. त्यामुळे त्यांनी निमंत्रित केले. कला क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे. प्रसिद्ध संगीतकार अवधूत गुप्ते उपस्थित होते. तसेच, खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे आणि सहकार मंत्री अतुल सावे होते. सांस्कृतिक व्यासपीठावर दोन पक्षांचे नेते एकत्र येणे, हे महाराष्ट्रासाठी नवे नाही, अशी ‘‘राजकीय बॅलन्स’’ करणारी प्रतिक्रिया माजी आमदार विलास लांडे यांनी ‘महाईन्यूज’शी बोलताना दिली.

विलास लांडे यांच्या ‘पॉलिटिकल बॅलन्स’ची कारणमिमांसा…
शहराच्या राजकारणातील पितामह भीष्म असलेले ‘योद्धा’ राजकारणी माजी आमदार विलास लांडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सर्वाधिक प्रभावी चेहरा असतानाही अडगळीत ढकलले गेले आहेत. प्रदेश पातळीवर मोठा संपर्क असतानाही त्यांच्या संघटनात्मक किंवा पक्षीय निर्णय घेण्याबाबत दुय्यम स्थान दिले जात आहे. राज्यातील आणि शहरातील बदलेली राजकीय परिस्थिती आणि वस्तुस्थिती याचा अंदाज घेता लांडे सोयीचे राजकारण करु शकतात. केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता आहे. महाविकास आघाडीची ताकद भाजपाने कमी केली असून, २०२४ मध्ये प्रचंड संघर्ष करावा लागणार आहे. त्यामुळे भाजपाशी जुळवून घेत राजकीय करिअरमधील उत्तरार्ध सुरक्षित करावा. कारण, राष्ट्रवादीला लांडेंच्या नेतृत्त्वाची किंमत नाही, असा काहीसा सूर लांडे समर्थकांमध्ये आहे. त्यामुळे २०२४ महाविकास आघाडीने उसळी घेतली तरी किंवा भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना सत्तेत आली तरीही आपले राजकीय जहाज सुरक्षित रहावे. याकरिता लांडे भाजपावर कसलीही टीका-टीपण्णी करीत नाहीत. दुसरीकडे, आपण राष्ट्रवादीसोबत आहोत, हे ठामपणे सांगतात. त्यामुळे सध्याची लांडे यांची रणनिती म्हणजे ‘‘ उडाला तर कावळा आणि बुडाला तर बेडूक’’ अशी सावध, दूरदृष्टीची आणि तितकीच चाणक्यनितीची आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button