TOP Newsताज्या घडामोडीविदर्भ

विदर्भातील जंगलांमध्ये बऱ्यापैकी वाघांची संख्या!

गोंदिया : पूर्व विदर्भातील जंगलांमध्ये बऱ्यापैकी वाघांची संख्या वाढली आहे. असे असले तरी बहुतांश वाघ शिकारीला बळी पडत आहेत तर काहींचा अपघातात मृत्यू झाला आहे. व्याघ्र संवर्धनासाठी शासन स्तरावरून पुढाकार घेण्यात आला आहे. याचाच एक भाग म्हणून चंद्रपूर जिल्हातील ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रातून गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्यात दोन वाघिणी दाखल होणार असून सदर प्रक्रिया शासन स्तरावरून सुरू झाली आहे.

प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर याच महिन्याच्या शेवटपर्यंत या वाघिणी नागझिरा अभयारण्यात दाखल होणार असल्याचे सांगितले जाते. ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रातून या दोन वाघिणी नागझिरा अभयारण्याच्या कक्ष क्रमांक १२६ मध्ये प्रवेश करणार असल्याचे वन विभागाच्या सूत्रांनी सांगितले. दोन्ही वाघिणींच्या हालचालींवर ड्रोन कॅमेऱ्याद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. नागझिरा अभयारण्य प्रशासनाकडून अधिकारी, कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून बफर झोनमधील गावांमध्ये व्याघ्र संवर्धनाबाबत व वन्यप्राण्यांपासून संरक्षण कसे करावे याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. नागझिरा आणि न्यू नागझिरा अभयारण्य हे वाघांच्या अधिवासासाठी ओळखले जातात. दशकभरापूर्वी नागझिरा अभयारण्यात १५ वाघांचे वास्तव्य होते. या अभयारण्यात बिबट्या, बायसन, निलघोडा, अस्वल, हरिण, यासह विविध दुर्मिळ वन्यप्राण्यांचा वावर आहे. आजच्या स्थितीत नागझिरा अभयारण्यात ८ वाघ असल्याचे सांगितले जाते.

वाघ व अन्य वन्यप्राण्यांच्या वास्तव्यामुळेच या अभयारण्याला दरवर्षी हजारो पर्यटक वन्यप्रेमी भेट देतात. हे पाहता नागझिरा अभयारण्य प्रशासनाने येथे वाघांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. उल्लेखनीय म्हणजे, याच अभयारण्यातून चंद्रपूर-गोंदिया रेल्वेमार्ग जातो. गतकाळात याच रेल्वेमार्गावर रेल्वेच्या धडकेत ३ वाघांचा मृत्यु झाला आहे. या अभयारण्याला लागून अनेक गावे आहेत. जे बफर झोन म्हणून घोषित करण्यता आले आहेत. अशा परिस्थितीत नागझिरा अभयारण्यात दोन नवीन वाघिणींच्या आगमनाबाबत नागझिरा अभयारण्य प्रशासनाने बफर झोनमधील गावांमध्ये ग्रामस्थांची बैठक घेऊन वाघिणींच्या संदर्भात व त्यांच्या संवर्धनाचे महत्त्व ग्रामस्थांना पटवून दिले जात आहे. वाघांचे संवर्धन, संरक्षण आणि वन्यप्राण्यांपासून संरक्षण कसे करावे याबाबत अभयारण्य प्रशासनातर्फे जनजागृती सुरू आहे. वन्यजीव विभागाचे अधिकारी, एनजीओ व विभिन्न उपकरणांच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाणार असल्याचे नागझिरा अभयारण्याचे क्षेत्र सहायक संजय पटले यांनी सांगितले. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सी-७ ही वाघिणी असून तिच्यासोबत दोन छावे आहेत. तर जवळपास चार ते पाच ननीन वाघांचे ‘लोकेशन’ दिसून येत आहे. यात विशेषत: गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा व वडसा वन परिक्षेत्रातील वाघांचे ‘लोकेशन’ मिळून येते. त्यात आता या दोन वाघिणींची भर पडणार आहे. त्यामुळे निश्चितच वाघांच्या संख्येत वाढ होणार असल्याचे नवेगावांधचे सहायक वन संरक्षक दादा राऊत यांनी बोलताना सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button