TOP Newsताज्या घडामोडी

शरद कोळींविरुद्ध धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे महाप्रबोधन यात्रेनिमित्त धरणगावात आयोजित जाहीर सभेत पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि त्यांच्या समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी धरणगाव येथील पोलीस ठाण्यात युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा सुरू आहे. यानिमित्त शिंदे गटात सहभागी झालेल्या जिल्ह्यातील आमदारांच्या मतदारसंघांमध्ये जाहीर सभा होत आहेत. धरणगाव, पाचोरा, एरंडोल, चोपडा येथे यानिमित्त सभा झाल्या. जळगाव ग्रामीण मतदारसंघातील धरणगावमध्ये झालेल्या सभेत पालकमंत्री पाटील यांच्याविरोधात वैयक्तिक टीकेसह गुजर समाजाबाबत युवासेनेचे राज्य विस्तारक कोळी यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांवरून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, यासाठी समाजबांधवांतर्फे निवेदन देण्यात आले. कोळी यांनी अतिशय खालच्या स्तरावर जाऊन पालकमंत्री पाटील यांच्यावर टीका केली. यामुळे गुजर समाजबांधव संतप्त झाले. याप्रकरणी कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षकांना देण्यात आले.

धरणगाव, पाचोरा, एरंडोल येथे यानिमित्त झालेल्या सभांमध्ये सुषमा अंधारे यांच्यासोबत शरद कोळी यांनी अतिशय आक्रमक भाषण केले. त्यांनी शिंदे गटाच्या आमदारांवर शेलकी भाषेत टीका केली. जिल्हाधिकार्‍यांनी कोळी यांना भाषण करण्यास बंदी घातली आहे. पोलीस प्रशासनाने याबाबतची नोटीस गुरुवारी कोळी यांना बजावली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी शरद कोळींना भाषणबंदीचे आदेश काढले. जिल्हाधिकार्‍यांनी काढलेल्या आदेशाची प्रत घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक ठाकूरवाड, रामानंदनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत हे रेल्वेस्थानकाजवळील जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत व शरद कोळी हे थांबलेल्या हॉटेलमध्ये गेले. तेथे निरीक्षक ठाकूरवाड व नजनपाटील यांनी सावंत यांना आदेशाची प्रत देऊन कोळी यांना ताब्यात देण्याचे सांगितले. मात्र, शिवसेनेतर्फे आदेशात भाषणबंदी नमूद असल्याचे सांगून ताब्यात घेण्याचे आदेश नसल्याचे स्पष्ट केले. त्यांनी ठाकूरवाड यांनी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्याशी संपर्क साधत संवाद साधला. मात्र, कोळी यांना पोलिसांनी घेरले होते. अप्पर पोलीस अधीक्षक गवळी येत असल्याचे पोलीस अधिकार्‍यांनी शिवसैनिकांना सांगितले. शिवसैनिकांनी यावेळी प्रचंड घोषणाबाजी केली. शिवसैनिक हॉटेलच्या बाहेर आल्यानंतर पोलिसांनी कोळींना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्कप्रमुख सावंत व सुषमा अंधारे यांनी नजनपाटील व ठाकूरवाड यांना अटकेचे आदेश मागितले.

सावंत यांनी भाषणाला बंदी आहे, सभेला हजर राहण्यास नाही. त्यामुळे कोळी हे सभा व्यासपीठावर उपस्थित राहतील. धऱणगाव पोलिसांत मी स्वतः हजर करतो, असे पोलीस अधिकार्‍यांना सांगितले. दरम्यान, सावंत यांनी पोलीस ठाण्यात पायी जाऊन हजर होतो, असे सांगत शहर पोलीस ठाण्याकडे निघाले. त्यांच्यासोबत शरद कोळी, सुषमा अंधारे, गुलाबराव वाघ, कुलभूषण पाटील, सुनील महाजन, विष्णू भंगाळे, गजानन मालपुरे आदींसह शेकडो शिवसैनिक व. वा. वाचनालय संकुलासमोरून व शेजारील गल्लीतून महापालिकामार्गे टॉवर चौकात निघाले. त्यावेळी पालकमंत्री व पोलीस प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

जिल्हाधिकारी मित्तल यांनी गुरुवारी सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत पाच-सहा तासांमध्ये तीन लेखी आदेश काढले. पहिल्या आदेशात, शरद कोळी यांनी दोन नोव्हेंबर रोजी पालकमंत्री पाटील व गुजर समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यामुळे कायदा-सुव्यवस्था भंग होऊन समाजांत द्वेष निर्माण होऊन दंगलीसारखे गंभीर घडू शकतात. त्यामुळे त्यांना जिल्ह्यात सभांमध्ये व समाजमाध्यमांवर भाषण करण्यास प्रतिबंध केला. दुसर्‍या आदेशात, मुक्ताईनगर व चोपडा येथील सभेत शरद कोळींकडून कायद्याचा भंग होऊन जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून त्यांना जिल्ह्यातून निघून जाण्याबाबत आदेशात म्हटले आहे. तसेच फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३चे कलम 1१४४ (२) अन्वये एकतर्फी आदेश लागू केले आहेत, तर तिसर्‍या आदेशात मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौकात शुक्रवारी बाळासाहेबांची शिवसेनेतर्फे महाआरती होणार होती. पालकमंत्री पाटील हे उपस्थित राहणार होते, तर तेथेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जाहीर सभेत उपनेत्या सुषमा अंधारे मार्गदर्शन करणार असल्याने एकमेकांचे समर्थक समोरासमोर येऊ शकतात. म्हणून या दोन्ही कार्यक्रमांची परवानगी रद्द करण्यात आली असल्याचे म्हटले आहे.

जाहीर सभेत कोळी यांनी पालकमंत्री पाटील यांच्यासह शिंदे सरकार आणि त्यांच्या मंत्री सहकार्‍यांविरूध्द आक्षेपार्ह वक्तव्य करून दोन समाजांत तेढ निर्माण केल्याबद्दल धरणगाव येथील पोलीस ठाण्यात बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पदाधिकारी बाळू जाधव यांनी फिर्याद दिली. यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा शरद कोळींसह आयोजकांविरुद्धही दाखल करण्यात आला आहे. यामुळे पोलीस तपासात अजून संशयितांच्या नावांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी महापौर जयश्री महाजन यादेखील आल्या. पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा हेही आले. त्यांच्याशी वरिष्ठ पदाधिकारी संवाद साधत असताना महापौर महाजन यांच्या खासगी मोटारीतून कोळी हे ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, तेथून पसार झाले. त्यांच्यामागे काही अंतराने पोलीस व्हॅनही गेल्याचे सांगण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button