Breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

सामाईक प्रवेश परीक्षेच्या निकालात गोंधळ?

प्राप्तांक सामान्यीकरणाचे सूत्र चुकीचे असल्याचा आक्षेप

अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेच्या निकालानुसार कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तायादीत वरचे स्थान आणि जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना खालचे स्थान असा अजब प्रकार होण्याची चिन्हे आहेत. वेगवेगळ्या दिवशी झालेल्या परीक्षांमध्ये सर्व विद्यार्थ्यांना समान पातळीवर संधी मिळावी यासाठी करण्यात आलेल्या सूत्रामुळे हा गोंधळ ओढवणार असून त्यावर पालक, शिक्षक आणि तज्ज्ञांनी आक्षेप घेतला आहे.

या गोंधळामुळे, अभियांत्रिकीला जायचे निश्चित करून पीसीएम गटाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना चांगली महाविद्यालये मिळवण्यासाठी झगडावे लागणार आहे तर अभियांत्रिकीचा पर्यायी म्हणून विचार करणाऱ्या पीसीएमबी गटाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष गुण कमी असूनही त्यांना चांगली महाविद्यालये मिळण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र राज्य प्रवेश नियमन प्राधिकरणाने घेतलेल्या सामाईक प्रवेश परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यंदा प्रथमच ही परीक्षा ऑनलाइन घेण्यात आली. या परीक्षेत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष गुणांऐवजी पर्सेटाइल देण्यात आले. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित हे तीन विषय घेऊन म्हणजे पीसीएम, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र म्हणजे पीसीबी आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र  म्हणजे पीसीएमबी; अशा तीन स्तरांवर विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते. मात्र गुणांवरून पर्सेटाइल निश्चित करताना पीसीएमची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे गुण अधिक असूनही त्यांचे पर्सेटाइल कमी आहेत. त्याच वेळी पीसीएमबी विषयांची परीक्षा दिलेल्यांचे पीसीएममधील प्रत्यक्ष गुण हे कमी असूनही त्यांचे पर्सेटाइल जास्त आहेत. त्यामुळे अभियांत्रिकी अभ्यासक्रमांनाच प्रवेश घ्यायचा हे निश्चित करून फक्त पीसीएम विषयाची परीक्षा देणारे विद्यार्थी त्या गटातील स्पर्धेमुळे मागे पडले आहेत.

पीसीएमची परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थ्यांला उत्तरसूचीनुसार १७१ गुण मिळणे अपेक्षित आहे. त्याला ९९.६९ पर्सेटाइल मिळाले आहेत. त्याच वेळी पीसीएमबीच्या गटात परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांला १७० गुण असताना त्याचे पर्सेटाइल हे ९९.९९ पर्सेटाइल आहेत, तर १४३ गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांला ९९.६९ पर्सेटाइल आहेत. ‘प्राप्तांकाचे सामान्यीकरण करताना ज्या विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकीला जायचे ठरवून अभ्यास केला त्यांची चांगल्या महाविद्यालयाची संधी डावलली जाण्याची शक्यता आहे,’ असे पालकांनी सांगितले.

‘‘ही परीक्षा १९ सत्रांमध्ये घेण्यात आली. गणित आणि भौतिकशास्त्रावर लक्ष केंद्रित करून अभियांत्रिकी प्रवेशाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पीसीएमची परीक्षा दिली. त्यांना अधिक  गुण असूनही त्यांचे पर्सेटाइल कमी आहेत. त्या तुलनेत पीसीएमबीची परीक्षा देणारे अपवाद वगळता बहुतेक विद्यार्थी हे गणित किंवा भौतिकशास्त्रापेक्षा जीवशास्त्राकडे अधिक कल असलेले आहेत असे दिसते. त्यांना तुलनेने पीसीएममध्ये गुण कमी मिळाले आहेत. असे असतानाही त्यांचे पर्सेटाइल अधिक आहेत, त्यामुळे गणित, भौतिकशास्त्र अशा विषयांकडे तुलनेने कमी कल असलेल्या विद्यार्थ्यांना चांगल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांत प्रवेश मिळेल. अगदी ९० गुण असलेल्या विद्यार्थ्यांचे पर्सेटाइल हे ९८ आहेत,’’ असे प्रवेश परीक्षांचे मार्गदर्शक हरीश बुटले यांनी सांगितले.

‘निकालात गोंधळ नाही’

‘निकालात कोणताही गोंधळ नाही,’ असा दावा प्रवेश नियमन प्राधिकरणाचे आयुक्त आनंद रायते यांनी केला. पर्सेटाइलचे सगळीकडे वापरले जाणारेच सूत्र इथेही आहे. मात्र आपल्याकडे पर्सेटाइल हे विद्यार्थ्यांच्या सवयीचे नाहीत. त्यामुळे त्यांचा गोंधळ होतो आहे, असे ते म्हणाले. त्यासाठी पर्सेटाइल कसे काढण्यात आले, काय सूत्र वापरण्यात आले हे स्पष्ट करण्यात येईल. त्याचप्रमाणे प्रवेश प्रक्रियेत मदत करण्यासाठी राज्यभर ३६७ सेतू केंद्रे उभारण्यात आली आहेत, तेथेही विद्यार्थ्यांच्या शंका दूर केल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.

गोंधळ कसा?

विद्यार्थ्यांला मिळालेले सर्वाधिक गुण हे १०० पर्सेटाइल धरून त्यानुसार गुणवत्तायादी जाहीर केली गेली. प्रत्येक सत्रातील विद्यार्थ्यांचे पर्सेटाइल काढून त्याचे सामान्यीकरण करण्यात आले. ही परीक्षा २ ते १३ मे दरम्यान झाली. २ आणि ३ मे या दोन दिवशी पीसीएमची परीक्षा देणारे विद्यार्थी होते. हे विद्यार्थी अभियांत्रिकी परीक्षेचीच तयारी करणारे होते. त्यामुळे या गटातील स्पर्धा अधिक होती, त्यामुळे या विद्यार्थ्यांचे गुण अधिक असूनही पर्सेटाइल कमी झाले. जेईईलाही पर्सेटाइलनुसारच निकाल जाहीर केले जातात. मात्र जेईईला गटानुसार परीक्षा होत नाही, तर तेथे रँडम सॅम्पलिंग असते. रँडम सॅम्पलिंग न झाल्यामुळे पर्सेटाइल आणि गुण यांमध्ये मोठी तफावत दिसत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group