खासदार बारणेंच्या विजयाचे श्रेय लाटण्यासाठी भाजपात ‘ओढाताण’, महासभेत पडसाद
- महासभेत नगरसेवकांनी साधले नेत्यांवर शरसंधान
- श्रेय लाटणारा चिंचवडचा नेता कोण, जगताप?
पिंपरी, (महाईन्यूज) – शहरातल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल आदी भाजप संलग्न संस्था संघटनांनी लोकसभा निवडणूकपूर्व कार्यकाळात आहोरात्र मेहनत घेतली. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून मावळसह देशभरातील मतदारांनी मतदान केले. त्यामुळेच खासदार श्रीरंग बारणे यांचा विजय झाला. त्यांच्या विजयाचे श्रेय कोणी एकटा दुकटा व्यक्ती घेत असेल तर ते निषेधार्ह आहे, अशा शब्दांत भाजपचे नगरसेवक संदीप वाघेरे आणि अॅड. मोरेश्वर शेडगे यांनी सभागृहात बारणेंच्या विजयाचे श्रेय घेऊ पाहणा-या भाजपच्याच नेत्यांवर शरसंधान साधले.
- पिंपरी-चिंचवड महापालिकेची गेल्या महिन्यातील तहकूब महासभा महापौर राहूल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. सभेत खासदार श्रीरंग बारणे यांच्या विजयाचे श्रेय लाटणा-या नेत्यांच्या स्वार्थी भूमिकेवर खर्डून टिका झाली. वास्तवीक लोकसभा निवडणुकीपूर्वी खासदार बारणे यांचे काम करण्याबाबतची भाजप नेत्यांची भूमिका संशयास्पद होती. शेवटी युतीधर्माच्या जोखडापायी विरोधात गेलेले भाजपचे नेते, पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांना बारणेंचे काम करण्याची नामुष्की आली. त्यांनी किती प्रामाणीकपणे काम केले हे त्यांनाच माहीत. परंतु, बारणेंचा विजय झाल्यानंतर ही मंडळी श्रेय लाटण्यासाठी रस्त्यावर उतरली. चौकात पेढे वाटप करून आम्ही केलेल्या कामामुळेच बारणेंचा विजय झाल्याचे त्यांनी ठणकाऊन सांगितले. ते निष्ठावंत भाजपच्या नगरसेवकांना पटले नाही. त्याचे पडसाद आज महासभेत उमटले.
बारणेंच्या विजयाचे श्रेय लाटण्यावरून भाजपांतर्गत नगरसेवक, कार्यकर्त्यांमध्ये सोशल वॉर झाले होते. मात्र, आज प्रत्यक्षात महासभेत मोदींच्या अभिनंदनाचा ठराव मांडत असताना श्रेय लाटणा-या नेत्यांवर सडकून टिकाही झाली.
- संदीप वाघेरे म्हणाले, बारणेंचा विजय हा केवळ शहरातल्या एका नेत्याने काम केल्यामुळे झालेला नाही. तर, भाजप संलग्न आरएसएस, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आदी संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आहोरात्र काम केल्यामुळे झालेला आहे. त्यामुळे बारणेंच्या विजयाचे श्रेय शहरातला एकटा व्यक्ती लाटत असेल तर ते निषेधार्ह आहे. मुळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यामुळे अखंड देशातील जनतेने भाजपला कौल दिला आहे.
अॅड. मोरेश्वर शेडगे म्हणाले, चिंचवडमध्ये आरएसएसचे काम करणारे जुने जाणते सदस्य अत्यंत निष्ठावंत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी आहोरात्र मेहनत घेतली आहे. त्यामुळेच बारणे यांचा विजय झालेला आहे. याचे श्रेय एकटा व्यक्ती लाटूच शकत नाही. जर, लाटत असेल तर ते अत्यंत चुकीचे आहे. भाजप ही तळागाळात रुजलेली आहे. मोदींनी केलेल्या कामावर विश्वास ठेवून लोकांनी बारणेंना मते दिली आहेत.