लालपरी होणार ७१ वर्षांची …
![# Covid-19: Immediately hire the heirs of the employees who died due to corona](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/st-bus.jpg)
राज्यातील खेड्या पाड्यांतून, गावागावांतून लीलया विहार करणारी आपल्या सर्वांची लाडकी लालपरी आता ७१ वर्षाची होणार आहे. या लालपरीचा म्हणजेच एसटीचा ७१ वा वर्धापन दिन येत्या शनिवारी १ जून रोजी राज्यात सर्व विभागीय आणि जिल्हापातळीवरील एसटीच्या ५६८ बसस्थानकावर मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.
राज्यातील कोट्यवधी प्रवाशांची लोकवाहिनी ठरलेल्या लालपरी म्हणजे एसटीने काळानुसार कात टाकली असून अनेक स्वागतार्ह बदलही केले आहेत. एसटी म्हणजे केवळ प्रवाशांची वाहतूक करणारी यंत्रणा एवढेच मर्यादित नसून एसटीने सातत्याने सामाजिक बांधिलकी जपली आहे. राज्यावर आलेल्या दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीत एसटीने नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे. राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या तसेच गोरगरीब आणि वंचित मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात राहता यावे, यासाठी एसटीने पुढाकार घेत प्रवासात सवलती दिल्या आहेत. एसटीने लालपरी पासून सुरु केलेला प्रवास हिरकणी, शिवनेरी, शिवशाही ते विठाई असा सुखद टप्प्यावर आणला आहे. एसटीचा ७१ वा वर्धापन दिन राज्यातील सर्व एसटी आगार आणि कार्यालयांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
एसटीच्या मुंबईतील प्रमुख कार्यालयातही हा सोहळा करण्यात असून यानिमित्ताने गोकुळदास तेजपाल सभागृहात एका दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वी दुपारी दोन वाजता आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सुरुवातीला ज्येष्ठ कवी अशोक नायगांवकर आणि रामदास फुटाणे आपल्या सदाबहार काव्यसुमनांची मेजवानी आयोजित करण्यात आली आहे. तसेच उल्लेखनीय कामगिरी करीत सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे. तसेच एसटीच्या चित्ररथाचेही उद्घाटन करण्यात येणार आहे.