मलेशियाचे पंतप्रधान पद एक-दोन वर्षात सोडणार- महातिर
क्वालालम्पूर (मलेशिया) – मलेशियाचे पंतप्रधान पद एक-दोन वर्षेच सांभाळणार असल्याचे पंतप्रधान महातिर मुहम्मद यांनी स्पष्ट केले आहे. एक-दोन वर्षांनी आपण पंतप्रधानपद सोडणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर अन्वर इब्राहिम हे पंतप्रधान बनतील असे सांगण्यात आले आहे. सध्या तुरुंगात असलेले अन्वर इब्राहिम बुधवारी मुक्त होणार आहेत.
92 वर्षांच्या महातिर मुहम्मद यांनी गेल्या आठवड्यात झालेल्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवला होता. पंतप्रधान बनल्यानंतर जगातील सर्वाधिक वयाचे पंतप्रधान बनण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदला गेला आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील चार पक्षांच्या युतीने गेली सहा दशके सत्तेवर असलेल्या बारिसन राष्ट्रीय युतीचा पराभव केला होता. बारिसन राष्ट्रीय युतीचे नेते, माजी पंतप्रधान नजीब रजाक यांच्यावर खटला दाखल करणार असल्याचे महातिर यांनी सांगितले आहे.
नजीब रज्जाक यांच्यावर कोट्यवधी डॉलर्सच्या भ्रष्टाचाराचा आरोप आहे. तुरुंगातून सुटल्यानंतर अन्वर इब्राहिम हेच पंतप्रधान बनतील असे झालेल्या निवडणुक प्रचारात जाहीर करण्यात आले होते. नव्वदच्या दशकात महातिर मुहम्मद पंतप्रधान असताना त्यांनीच अन्वर इब्राहिम यांना पक्षातून काढून टाकून पदाचा दुरुपयोग आणि लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली तुरुंगात टाकले होते.