रिक्षाचालकांच्या वैद्यकीय पत्रिकेत ‘कर्क’योग!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/auto.jpg)
तपासणी केलेल्या तीन हजारांपैकी ४५ टक्के चालक कर्करोगाने ग्रस्त
मुंबई : कुर्ला, सांताक्रुझ, बोरिवली, गोरेगाव आणि मालाड या उपनगरांमध्ये तपासणी करण्यात आलेल्या तब्बल तीन हजार रिक्षाचालकांपैकी ४५ टक्के चालकांमध्ये कर्करोगाची लक्षणे दिसून आली आहेत. ही लक्षणे तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे आहेत.
‘कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन’ने (सीपीएए) गेल्या पाच महिन्यांमध्ये मुंबईत तपासणी शिबिरे घेतली. प्लाकिया, सब म्युकस फायब्रॉसीस, बायोप्सी, एफएनएसी आदी रोगांचा प्रादुर्भाव या तपासणी दरम्यान आढळून आला. उन्हातान्हातील काम, ताणतणाव, जेवणाच्या वेळा टळणे, प्रदूषण आणि कुटुंबापासून दुरावा अशा अनेक कारणांमुळे रिक्षाचालकांमध्ये तंबाखू सेवनाची सवय जडल्याचे समोर आले. त्यात रिक्षाचालकांना आर्थिक विवंचनेमुळे कायमच वैद्यकीय सेवांपासून वंचित राहावे लागते. या सर्वेक्षणामध्ये तंबाखू सेवनाची कारणे, कर्क रोग होण्याचे प्रमाण आणि कर्क रोगाची लक्षणे जाणून घेऊन, रिक्षाचालकांना अशा व्यसनातून मुक्त करण्यासाठी सीपीएएतर्फे समुपदेशन केले जाईल. सीपीएएतर्फे २०१९च्या अखेपर्यंत पाच हजार चालकांची तपासणी केली जाणार आहे. या आरोग्य शिबिरांमध्ये मान आणि डोक्याच्या चाचण्यांसोबतच लरिंगोस्कोपी, ओरल कव्हिटी, बुक्कल म्युकासोची व्हिज्युअल तपासणी, हार्ड अँड सॉफ्ट पॅलेट, टंग अँड जिंजीव्हो, बुक्कल सल्कस यांसारख्या तपासण्या केल्या जातात. त्यातून कर्क रोगपूर्व डाग असतील तर ते दिसून येतात. त्यासाठी कान-नाक-घसा तसेच मान आणि डोके यांच्या तपासण्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून केल्या जातात. या तपासण्यांमध्ये संपूर्ण शारीरिक तपासणी के ली जाते.
‘या तपासण्यांव्यतिरिक्त तणाव व्यवस्थापनाचे धडे देऊन आवश्यक त्या चाचण्या संस्थेमार्फत विनामूल्य केल्या जातील. या सर्वेक्षणांनंतर काही रिक्षाचालकांनी तंबाखू सोडून देण्याचा निर्धार केला आहे. अशा मोहिमांच्या माध्यमातून व्यसनाधीनतेवर नक्कीच विजय मिळवता येईल,’ असा विश्वास ‘सीपीएए’च्या कार्यकारी संचालिका अनिता पीटर यांनी व्यक्त के ला.
‘रिक्षाचालकांमध्ये तणावाचे प्रमाण अधिक असते आणि त्यांना प्रदूषणाचाही सामना करावा लागतो. कुटुंबापासून ते खूप काळ दुरावलेलेही असतात आणि त्यामुळे त्यांना तंबाखू सेवनासारखी सवय लागते. त्यावर उपाय म्हणून वारंवार अशा मोहिमा राबविण्याची गरज आहे,’ असे ‘मुंबई ऑटोरिक्षा-टॅक्सीमेन युनियन’चे अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितले.
बेस्टचालकांमध्येही लक्षणे
केवळ रिक्षाचालकच नव्हे तर बेस्ट बसगाडय़ा चालविणाऱ्या अनेक चालकांमध्येही तंबाखू सेवनाचे प्रमाण जास्त असल्याने कर्करोगाची लक्षणे दिसून आली आहेत. ब्रिटिश मेडिकल जर्नलने घेतलेल्या आढाव्यानुसार बेस्टच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी ४२ टक्के कर्मचारी हे तंबाखूचे नियमित सेवन करतात. तर चार हजार कर्मचाऱ्यांना घेऊ न केलेल्या विशेष सर्वेक्षणात ७४३ कर्मचाऱ्यांमध्ये कर्क रोगाची प्राथमिक लक्षणे दिसून आली.