प्रसुतीमध्ये डाॅक्टरचा हलगर्जीपणा नडला, महिलेसह अर्भकाचा मृत्यू
![young man died due to gas gieser blast suffocating breath](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/death-186_201905235119.jpg)
पिंपरी – प्रसुती दरम्यान अर्भकासह महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. ९) रात्री साडेअकराच्या सुमारास चाकण येथे घडली. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
सपना सुधीर पवळे (वय ३०, रा. वाकळवाडी, ता.खेड, जि. पुणे, सध्या रा. फ्लॅट नं. ३०२, सुगंध बिल्डिंग इकोग्राम, शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे) असे मयत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सपनाचे पती सुधीर मच्छीन्द्र पवळे (वय ३०, रा. वाकळवाडी, ता. खेड, जि. पुणे ) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, चाकण येथील अरगडे हॉस्पिटलचे डॉ. असित अरगडे, क्रिटिकेअर हॉस्पिटलचे डॉ. राजेश घाटकर व डॉ. सुपेकर यांच्यावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सपनाला गुरुवारी रात्री प्रसुतीसाठी डॉ.अरगडे यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी औषधोपचार करताना अधिक त्रास होऊ लागल्याने महिलेला क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. येथे मात्र प्रसुती करताना अर्भक मुलगी मृत झाली. त्यानंतर सपनाही गंभीर झाल्याने पुढील उपचारासाठी आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी तिला तपासण्या पूर्वीच मयत झाली असल्याचे घोषित केले. हलगर्जीपणे उपचार, इंजेक्शन, चुकीच्या गोळ्या व सलाईन दिल्याने सपनाचा मृत्यू झाला असून तिच्या मृत्यूस जबाबदार झाल्याने तिन्ही डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. चाकण पोलीस तपास करत आहेत.